Bihar Assembly Election 2020: चिराग पासवान यांना मतदार देणार राज ठाकरे यांच्याप्रमाणेच धक्का?
राम विलास पासवान हे केंद्रातील एनडीए सरकारमध्ये मंत्री आहेत. असे असताना चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणूक 2020 मध्ये आपला पक्ष लोजपा एनडीएतून बाहेर काढला आहे. हा पक्ष 143 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Assembly Elections 2020) मध्ये जवळपास सर्वच पक्ष स्वबळ विसरले आहेत. कोणत्याही पक्षाला जनता स्वत:च्या बळावर पाठिंबा देईल असा विश्वास वाटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राष्ट्रीय म्हणवणारे आणि प्रादेशिक अस्मितेची शेखी मिरवणारे पक्ष आघाडीचे राजकारण करत आहेत. यात काँग्रेस (Congress), भाजप (BJP), राजद (RJD), जदयु (JDU), हम यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. दरम्यान, चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या लोक जनशक्ती पार्टी (LJP) सारखे काही अपवाद पक्ष स्वबळ (?) आजमवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू, हे स्वबळ राष्ट्रीय पक्षाशी (भाजप) असलेली गुप्त आघाडी आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, चिराग पासवान हे लोकसभा निवडणूक 2014 प्रमाणे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेमार्गावर असल्याचीही चर्चा आहे.
चिराग पासवान हे लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक राम विलास पासवान यांचे चिरंजीव आहेत. राम विलास पासवान हे केंद्रातील एनडीए सरकारमध्ये मंत्री आहेत. असे असताना चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणूक 2020 मध्ये आपला पक्ष लोजपा एनडीएतून बाहेर काढला आहे. हा पक्ष 143 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चिराग पासवान यांच्या पक्षाच्या शिडात खरोखरच इतकी हवा आहे का? चिराग यांनी इतका आत्मविश्वास आणला कोठून असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावरुनच चिराग हे राज ठाकरे यांच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणूक 2014 मध्येही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. धक्कादायक असे की, राज ठाकरे यांनी या निवडणुकीत मतदारांना अवाहन करत घोषणा केली होती की, आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडूण द्या. निवडून आलेले मनसेचे खासदार केंद्रात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील. दरम्यान, पुणे येथील एका सभेत भाजप नेते राजनाथ सिंह यांनी राज ठाकरे यांच्या घोषणेला टाचणी लावली. राजनाथ सिंह यांनी म्हटले की, मतदारांनी इतरांचे उमेदवार निवडून देऊन त्यांचा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना देण्यापेक्षा थेट भाजपचेच उमेदवार निवडून द्यावेत. भाजपचे निवडूण आलेले खासदार अधिक भक्कमपणे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहतील. घडलेही तसेच, लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. परिणामी मनसेला भोपळाही फोडता आला नाही. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: शिवसेना धनुष्यबाणाचा घेतला नीतीश कुमार यांनी धसका; JDU पक्षाची निवडणूक आयोगाकडे धाव)
दरम्यान, लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही घोषणा केली आहे की, अपवाद वगळता त्यांचा पक्ष भाजपच्या विरोधात उमेदवार उतरवणार नाही. त्यांचा पक्ष केवळ नीतीश कुमार यांच्या जदयू विरोधात उमेदवार उतरवणार आहे. तसेच, निवडणुकीनंतर केंद्रत जसे भाजपच्या नेतृत्वात सरकार आहे. त्याच पद्धतीने बिहारमध्येही भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल. हे सरकार स्थापन होण्यासाठी त्यांच्या लोक जनशक्ती पक्षाची भूमिका मोठी आणि महत्त्वाची असेल.
दरमयान, चिहाग पासवान यांच्या एकूण राजकारणाचा अर्थ काढताना त्याकडे संशयाने पाहिले जात आहे. लोकजनशक्ती पार्टी केंद्रात एनडीएत सहभागी असताना तसेच, वडील लोजपा नेते राम विलास पासवान) केंद्रात मंत्री असताना चिराग यांनी एनडीएतून बाहेर पडत वेगळी चूल का मांडली? तसेच निवडणुकीनंतर ते भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची वार्ता का करत आहेत. जर असे असेल आणि भाजपच्याच नेतृत्वाखाली जर बिहारमध्ये सत्ता आणायची असेल तर मतदार थेट भाजप उमेदवाराच पाठिंबा देतील. भाजपचेच उमेदवार अधिकाधिक निवडूण आणतील. त्यामुळे चर्चा होत आहे की,चिराग पासवान हे देखील राज ठाकरे यांच्या मार्गावर आहेत.