लॉक डाऊनदरम्यान Asian Paints चा मोठा निर्णय; संकटकाळात कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पगारामध्ये केली वाढ

लॉक डाऊन (Lockdown) मुळे सर्वसामान्यांसाठी हा फारच कठीण काळ ठरत आहे. याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर आणि देशातील जवळपास सर्व कंपन्यांच्या कमाईवरही झाला आहे.

Logo of Asian Paints (Photo Credits: Twitter)

देश सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटाशी सामना करीत आहे. लॉक डाऊन (Lockdown) मुळे सर्वसामान्यांसाठी हा फारच कठीण काळ ठरत आहे. याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर आणि देशातील जवळपास सर्व कंपन्यांच्या कमाईवरही झाला आहे. अशा परिस्थितीत, अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकत आहेत, अनेक कंपन्यांनी पगारवाढ थांबवली आहे किंवा पगारामध्ये कपात केली आहे. मात्र देशात अशी एक कंपनी आहे जिने माणुसकी राखून या कठीण काळात आपल्या कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  मीडिया रिपोर्टनुसार एशियन पेंट्स (Asian Paints) या पेंट्स निर्माता कंपनीने हे मोठे पाऊल उचलले आहे.

संकटकाळात कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने विक्री चॅनेललाही मदत करण्याचे ठरविले आहे. यासाठी विक्री चॅनेलचा हिस्सा म्हणून कंपनीने 40 कोटी रुपये कंत्राटदारांच्या खात्यात वर्ग केले आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शिंगल सांगतात, 'आम्हाला खर्‍या नेतृत्वाचे उत्तम उदाहरण उभे करायचे होते. आम्हाला हे देखील सिद्ध करायचे होते की, एक संस्था म्हणून आम्ही आमच्या भागधारकांची काळजी घेतो. त्यामुळे आम्ही कर्मचार्‍यांचे वेतन वाढविण्याचा निर्णय घेतला, ज्याला मंडळाच्या सदस्यांकडून सहमती प्राप्त झाली आहे.'

अशाप्रकारे या कठीण काळात, एशियन पेंट्स आपल्या कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी उभे राहून, केवळ इतर नामांकित कंपन्यांसाठी एक उत्तम उदाहरणच ठरले नाही तर, या कठीण काळात कर्मचार्‍यांना काढून न टाकता त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहनही त्यांनी पूर्ण केले आहे. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, केंद्र व राज्याच्या कोविड19 फंडालाही कंपनीकडून 35 कोटी रुपये दान देण्यात आले आहेत. (हेही वाचा: #VocalForLocal: स्वदेशी उत्पादनांसाठी बाबा रामदेव लवकरच लाँच करणार ऑनलाईन पोर्टल 'Order Me')

दरम्यान, एशियन पेंट्सचा रिटर्न ऑन इक्विटी (आरओई) ट्रॅक रेकॉर्ड बर्‍यापैकी चांगला आहे. त्यांचा तीन वर्षाचा आरओई 25.49 टक्के आहे. गेल्या पाच वर्षांपासून कंपनीच्या विक्रीत वार्षिक 9.62 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि वार्षिक नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनी अनेक वर्षे कर्जमुक्त आहे.