Badlapur School Student Abuse Incident: बदलापूरात चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासनाकडून चौघांवर कारवाई; नागरिकांकडून शहर बंदची हाक
अखेर मनसेच्या हस्तक्षेपानंतर रात्री 1 वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
बदलापूरमधील एका शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर कंत्राटी सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आज चार दिवसानंतर शाळा प्रशासनाला जाग आली असून त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. या प्रकरणावरुन शाळा प्रशासनाने सर्व पालकांची माफी मागितली असून आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला आहे. या प्रकरणावरुन संतप्त बदलापूरकरांनी मंगळवारी शहर बंदची हाक दिली आहे. (हेही वाचा - Thane Shocker: बदलापूर येथील 12 वर्षीय विदेशी मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती; आरोपी फरार)
दरम्यान या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं. अखेर मनसेच्या हस्तक्षेपानंतर रात्री 1 वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यावरून पोलीस प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत होता. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या प्रकरणावर शाळेकडूनही प्रतिक्रीया आली आहे. शाळेत यापुढे सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी यापुढे अनेक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शाळेने म्हटलं आहे.
या प्रकरणी मंगळवारी बदलापूर शहर बंद ठेवण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे. या बंदला रिक्षा तसंच व्यापारी संघटनेनं पाठींबा दिला आहे. या सगळ्या घटनेनंतर बदलापूर शहरातील सामाजिक संस्था, राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकारी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे. शाळेने जारी केलेल्या निवेदनात सध्याचा काळ शिक्षण संस्थेसाठी नाजूक असून या चिमुकल्या मुलींसोबत जो प्रकार घडला तो दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचं शाळेनं म्हटलं आहे.