Assembly Election Results 2021: कोविड-19 निर्बंधांचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी विजयाचा आनंद साजरा; Election Commission ने दिले FIR दाखल करण्याचे व SHO ला निलंबित करण्याचे आदेश

अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य सचिवांना अशा समारंभांवर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे

विजयोत्सव (Photo Credit : ANI)

देशात सध्या कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. दररोज लाखोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. जवळजवळ सर्वांनीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धास्ती घेतली आहे. मात्र या काळात देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections 2021) आयोजन करण्यात आले होते. तब्बल 62 दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर आज बंगाल, असम, तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी येथील निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. बंगाल, केरळ, असम आणि काही प्रमाणात तामिळनाडू येथील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. या पार्श्वभुमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा आनंद साजरा होताना दिसत आहे.

बंगालमध्ये ममता दिदींनी तृणमूलचा गड राखला आहे, केरळममध्ये पुन्हा एलडीएफ आणि आसाममध्ये पुन्हा भाजप सत्येत येत आहे. तामिळनाडूमध्ये सध्या तरी डीएमके आघाडीवर असल्याचे दिसत आहे. जसजसे मतमोजणीचे ट्रेंड समोर येत आहेत तस तसे समर्थक आपापल्या पक्षांच्या विजयाचा आनंद साजरा करीत आहेत. यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) कोणताही उत्सव, विजय, मिरवणुका, मेळावे यांच्यावर बंदी घातली आहे. मात्र लोकांचे विजयोत्सवाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर आयोगाने त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये अनेक समर्थक रस्त्यावर विजय साजरा करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य सचिवांना अशा समारंभांवर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे. घडत असलेल्या प्रकारची दखल घेऊन निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या मुख्य सचिवांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत की, अशा प्रकरणांमध्ये त्वरित एफआयआर दाखल करावा आणि संबंधित  SHO ला निलंबित करावे. तसेच या कारवाईची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवावी असेही सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: West Bengal Elections 2021 Results: TMC पश्चिम बंगाल मध्ये हॅट्रिकच्या तयारीत; Kalighat भागात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू)

सध्या टीमसीने 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतल्याने, कोलकाताच्या हेस्टिंग्ज क्षेत्रातील भाजपा कार्यालयाबाहेर तृणमूल कॉंग्रेसचे समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत.