Assembly Election Results 2021: एम करुणानिधी यांच्या पश्चात तामिळनाडूमध्ये प्रथमच DMK ची सत्ता; जाणून घ्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार MK Stalin यांच्याबाबत खास गोष्टी
त्यांनी स्वत: ची लढाई स्वतः लढली आणि 1996 मध्ये चेन्नईचे 44 वे महापौर झाले, ज्यात ते थेट निवडलेले होते
6 एप्रिल रोजी तामिळनाडू विधानसभा निवडणूक (Tamil Nadu Assembly Election) पार पडली. त्यानंतर आता 2 मे रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. राज्यात एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचा द्रविड़ मुनेत्र कड़गम (Dravida Munnetra Kazhagam) आणि एडप्पादी के पलानीस्वामी (Edappadi K. Palaniswami) यांचा अन्नाद्रमुक (AIADMK) पक्ष यांच्यात जोरदार टक्कर आहे. आज सकाळपासूनच द्रमुकची आघाडी असून के पलानीस्वामी यांचा पराभव करून डीएमके सत्तेत येणार असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर एमके स्टालिन यांच्या गळ्यात तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे हेही जवळजवळ निश्चित झाले आहे.
चला जाणून घेऊया तब्बल 10 वर्षानंतर सत्तेत येणाऱ्या द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांच्याबाबत काही खास गोष्टी. मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन यांचा जन्म 1 मार्च 1953 साली झाला. ते भारतीय राजकारणी आणि माजी अभिनेता आहेत, ज्यांना एमके स्टॅलिन म्हणून ओळखले जाते. ते तमिळनाडूचे प्रसिद्ध राजकारणी करुणानिधी आणि त्यांची दुसरी पत्नी श्रीमती दयालु अम्माल यांचे पुत्र आहेत. स्टॅलिन यांनी चेन्नईच्या मद्रास विद्यापीठातील नंदनम कला महाविद्यालयातून इतिहासातील पदवी संपादन पूर्ण केली.
2006 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते तामिळनाडू सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि स्थानिक प्रशासन मंत्री झाले. राज्यपाल सुरजितसिंग बरनाला यांनी 29 मे 2009 रोजी स्टॅलिन यांना तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणून नामित केले होते. त्यांचे मोठे बंधू एमके अझगिरी हे रसायन व खत मंत्री आहेत व त्यांची सावत्र बहिण कनिमोळी राज्यसभेची सदस्य आहेत. स्टॅलिन हे द्रमुकचे कोषाध्यक्ष आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. स्टालिन 1989 पासून चेन्नईच्या थाऊजंड लाईट्स मतदारसंघातून तमिळनाडू विधानसभेवर चार वेळा निवडून गेले आहेत. 1996 मध्ये स्टॅलिन हे शहरातील थेट निवडून आलेले पहिले महापौर झाले.
वडील करुणानिधी मुख्यमंत्री असताना स्टालिन 1989 आणि 1996 मध्ये आमदार होते, परंतु त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यांनी स्वत: ची लढाई स्वतः लढली आणि 1996 मध्ये चेन्नईचे 44 वे महापौर झाले, ज्यात ते थेट निवडलेले होते. करुणानिधी मंत्रिमंडळात जेव्हा त्यांना मंत्री करण्यात आले तेव्हा हे त्यांचा चौथा कार्यकाळ सुरु होता, त्यामुळे त्यांची प्रगती संथ आणि स्थिर आहे.
डीएमके पक्षाच्या स्थापनेची घोषणा 1949 साली झाली होती. 67 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने कॉंग्रेसला राज्यातील सत्तेपासून बाहेर केले. त्यानंतर 1969 मध्ये करुणानिधी यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते द्रमुकचे अध्यक्षही झाले. आता 2018 मध्ये त्यांच्या मृत्युनंतर द्रमुकची जबाबदारी कोणाच्या शिरावर द्यावी हा मोठा प्रश्न होता. त्यानंतर पक्षाने ही जबाबदारी स्टॅलिन यांच्यावर सोपवली. द्रमुक गेली 8 वर्षे सत्तेत नसल्याने स्टॅलिन यांचे काम फार कठीण होते. मात्र अवघ्या दोनच वर्षात त्यांनी आपली जादू दाखवली व आता तामिळनाडूमध्ये द्रमुक सत्ता सथापन करणार आहे.
महत्वाचे म्हणजे स्टॅलिन यांनी 1980 च्या दशकात काही तमिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. 1990 च्या मध्यामध्ये सन टीव्हीवरील दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. (हेही वाचा: तामिळनाडू सत्ता परिवर्तनाच्या मार्गावर; DMK 151 जागांवर आघाडीवर, Edappadi K. Palaniswami यांना पराभवाचा धक्का?)
दरम्यान, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पन्नेरसेल्वम, द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन, त्यांचा मुलगा उदयनिधी स्टालिन, अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम प्रमुख टीटीव्ही दिनाकरण, एमएनएमचे हसन आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एल. के. मुरुगन यांच्यासह सुमारे 4000 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 234 विधानसभा जागांवर निवडणुका घेण्यात आल्या आहेत. राज्यातील मोठे नेते जे. जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर राज्यातील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.