'रमजान'च्या महिन्यात रोजा मोडून मुस्लिम युवकाने मिळवले पुण्य, 85 वर्षीय हिंदू महिलेचे प्राण वाचवायला केले रक्तदान

रमजानच्या या पवित्र महिन्यात पुण्याचे काम केलेल्या मुन्नावर आता सर्वजण कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Image For Representation (Photo Credits: Instagram/Pixabay)

माणुसकीला कोणताच धर्म नसतो या वाक्याची प्रचिती देणारी एक बाब आसाम (Assam) मध्ये नुकतीच पाहायला मिळाली. रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांचे रोजा सुरु आहेत. आसामच्या सोनीतपूरमधील ढेकियाजुलीचा रहिवासी मुन्ना अन्सारी (Munna Ansari)  हा देखील मागील काही दिवसांपासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करून रोजा पाळत होता. मात्र विश्वनाथ रुग्णालयात रक्ताची गरज आहे असे सांगणाऱ्या एका फोनमुळे त्याने आपला उपवास सोडून अन्न ग्रहण केले व तातडीने रक्तदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी रवाना झाला. मुन्ना याच्या समयसूचक वागणुकींमुळे आता सगळ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरवात केली आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, विश्वनाथ रुग्णालयात 'रेवती बोरा' नामक एक 85 वर्षीय हिंदू महिला मागील एका आठवड्यापासून उपचार घेत होती. काही दिवसांपूर्वी तिला पित्त मूत्राशयाचे निदान करण्यात आले होते, उपचारादरम्यान तिला तातडीने बी-निगेटिव्ह् गटाच्या रक्ताची गरज भासून आली मात्र लगतच्या कोणत्याही जिल्हा रुग्णालयात किंवा रक्तपेढीत या गटाचे रक्त उपलब्ध नव्हते. यासाठी  रेवतीचे कुटुंब सलग तीन दिवस शोध घेत होते त्याच प्रयत्नांतून रेवती यांच्या मुलाने 'मानवता स्वयंसेवी रक्तदाता गटाच्या' फेसबुक पेजवर रक्ताची नितांत गरज असल्याची पोस्ट केली होती, ज्यावर उत्तर देत मुन्ना अन्सारी याने आपला रक्तगट देखील बी निगेटिव्ह असल्याचे सांगून रक्तदान करण्याची तयारी दाखवली व तातडीने रुग्णालयात धाव घेत आपले कर्तव्य पार पाडले.

मुन्ना अन्सारीची मदत मिळाल्याने रेवती बोरा यांचे उपचार सुरळीत चालू राहिले. या घटनेने भावुक झालेला रेवती यांचा मुलगा अनिल बोरा याने माध्यमांशी संवाद साधताना मुन्नाचे आभार मानत, "आजवर आमचे रक्ताचे नाते नव्हते पण मुन्नाने केलेल्या या दानाने आज आम्ही रक्ताच्या नात्याने जोडले गेलो आहोत. कोणतेही नाती ही धर्माच्या किंवा रक्ताच्या नाही तर माणुसकीच्या नात्यावर टिकून राहू शकतात हे मुन्नाने सिद्ध केले आहे" अशी भावना व्यक्त केली. रक्तदानाबाबतच्या या 10 समज-गैरसमजांमुळे तुम्हीही रक्तदान करत नाहीत का?

 

मुन्ना अन्सारी हा मानवता स्वयंसेवी रक्तदाता गटाचा नियमित रक्तदान करणाऱ्या सदस्यांपैकी एक आहे. आयुष्यभर यामार्गे लोकांची सेवा करणार असल्याचा ध्यास घेतलेल्या मुन्नाने समाजासमोर एक उदाहरण निर्माण केले आहे.