दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप च्या ८ महिला उमेदवारांचा विजय; मात्र एकीला सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या कॅबिनेट मध्ये स्थान नाही

त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत विविध आठ मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आलेल्या 8 ही महिला उमेदवार या विजयी ठरल्या आहेत मात्र तरीही त्यातील एकीला सुद्धा कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळवता आलेले नाही.

Arvind Kejriwal | (Photo credit: archived, edited, symbolic images)

आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी दिल्ली विधानसभेत (Delhi Vidhansabh Elections) विजयी पताका रोवल्यावर आज रामलीला मैदानात (Ramlila Maidan) तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळेस केजरीवाल यांच्या सोबत त्यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने सुद्धा पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यातील आश्चर्याची बाब म्हणजे केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात एका ही महिला मंत्रीला संधी देण्यात आलेली नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत विविध आठ मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आलेल्या 8 ही महिला उमेदवार या विजयी ठरल्या आहेत मात्र तरीही त्यातील एकीला सुद्धा कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळवता आलेले नाही. यंदा दिल्ली विधानसभेत आप ने निवडणुक वचनानाम्यात महिलांसाठी काम करण्यावरून अनेक मुद्दे मांडले होते, मात्र या मुद्द्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कॅबिनेट मंत्रिमंडळात एकाही महिलेला समाविष्ट करण्यात आलेले नाही.

(हे ही वाचा-Arvind Kejriwal Swearing-In Ceremony: अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ; भाषण करत 'हम होंगे कामयाब' गाणेही गायले)

प्राप्त माहितीनुसार दिल्लीतील विधानसभा मतदारसंघातून अतिशी मारलेना, राखी बिर्ला,राजकुमारी ढिल्लों, प्रीती तोमर, भावना गौर, बंदना कुमारी, धन्वंतरी चंडेला, प्रमिला टोकस यांना उमेदवारी देण्यात आली होती, या सर्वांनी आपापल्या ठिकाणाहून विजय मिळवला आहे. यापैकी सर्वच महिला नेत्यांनी यापूर्वी आप सोबत काम करताना महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती, अतिशी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सल्लागार म्ह्णून काम पाहिलेले आहे, त्यांच्याच कल्पनेतून दिल्लीतील शाळांचे रुपडे पालटले गेल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे राखी बिर्ला यांनी 2013- 14 मध्ये सुद्धा आपच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात काम करण्याचा अनुभव घेतलेला आहे.

दरम्यान, यंदा दिल्लीच्या निडवणुकीत आपने 70 जागांपैकी 62 जागी दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती घेतली आहे. आज अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्या सोबतच मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाळ राय, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन, राजेंद्र गौतम यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.