Badlapur School Case: बदलापूरमध्ये शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा शाळेच्या गेटवर मोर्चा

पालकवर्गाकडून प्रचंड संताप आणि चिड व्यक्त केली जात आहे.

Photo Credit- X

Badlapur School Case: कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरचा अमानुष छळ करुन तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही मुली अवघ्या साडेतीन ते चार वर्षांच्या आहेत. त्यामुळे या घटनेबाबत प्रचंड संताप आणि चिड व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने पालकवर्ग शाळेसमोर उभा राहिला आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते. (हेही वाचा:Central Railway Disrupts: मध्य रेल्वेचा खोळंबा; कळवा-ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर लोकल 15-20 मिनिटे जागीच )

आता त्या पोलिसांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर शाळेकडून माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे. शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी मागणी पालकांनी केली आहे. 'आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत' अशी पालकांची भावना असून, त्यांनी शाळा प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत.(हेही वाचा:Badlapur School Student Abuse Incident: बदलापूरात चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासनाकडून चौघांवर कारवाई; नागरिकांकडून शहर बंदची हाक )

राज्यात मुली आण महिला सुरक्षित नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. बदलापूर बंदमध्ये रिक्षा चालक, व्यापारी संघटना, शाळा बस चालक देखील सहभागी झाले आहेत. शाळा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांच्या उशिरा गुन्हा दाखल करण्यावर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

पालकांची मागणी आहे की शाळेने पुढे येऊन दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे.बदलापूरच्या आदर्श शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर सफाईचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराच्या एका कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.