Andhra - Telangana Flood: आंध्र आणि तेलंगणात मुसळधार पावसाचे थैमान, आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू तर 140 ट्रेन रद्द

रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काल रविवारी तातडीच्या बैठका घेतल्या होत्या.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मुसळधार पावसामुळे कमीत कमी 19 लोक मृत पावले आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या विविध भागातून 17,000 हून अधिक लोकांना हलवण्यात आले आहे, कारण सततच्या पावसामुळे राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होत आहे. सुमारे 140 गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत, अनेक भागांचा संपर्क तुटला आहे आणि हजारो लोक अडकून पडले आहेत. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना उधाण आले आहे. हैदराबाद आणि विजयवाडा सारख्या शहरांसह बराच मोठा भाग पाण्याखाली आहे.  (हेही वाचा - Telangana Flood: तेलंगणात पाऊस आणि पुराचा कहर, 100 हून अधिक गावे पाण्याखाली, 99 गाड्या रद्द )

पाहा व्हिडिओ -

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी बोलून दोन्ही राज्यांतील परिस्थितीची माहिती घेतली. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस अपेक्षित असल्याने केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पावसामुळे निर्माण झालेली परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काल रविवारी तातडीच्या बैठका घेतल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन्ही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांना केंद्राकडून संपूर्ण मदत पाठवण्याचे आश्वासन दिले. स्थानिक परिस्थितीनुसार 2 सप्टेंबर रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. रेल्वेचा विचा करता, दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने 140 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.