Lockdown काळात लोकांना घरी राहण्यासाठी स्वतः Coronavirus, यमराज आणि चित्रगुप्त करतायत आवाहन; जाणून घ्या आंध्रप्रदेश पोलिसांची हटके Trick
आंध्र प्रदेश पोलिसांनी स्थानिक कलाकारांना यमराज, चित्रगुप्त आणि कोरोना व्हायरसची रूप घ्यायला सांगून त्यांच्यामार्फत शहरात नागरिकांना लॉक डाउन काळात घरी राहण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊन (Lock Down) जारी करण्यात आले आहे. देशातील सर्व राज्यांच्या सीमा सील करून पूर्णपणे लॉक डाऊन केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकांना पुढील काही दिवस घरात राहून कोरोनाविरुद्ध लढ्यात मदत करण्याचे आवाहन केले आहे. मात्र अजूनही अशी काही मंडळी आहेत जी विनाकारण घराबाहेर पडून या लॉक डाऊन निर्णयाला पाठिंबा देत नाहीयेत अशा मंडळींना विनंती करण्यासाठी आता आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मधील कर्णूल जिल्ह्यातील ढोणे (Dhone) शहर पोलिसांनी एक अनोखा मार्ग स्वीकारला आहे. या पोलिसांनी स्थानिक कलाकारांना यमराज, चित्रगुप्त आणि कोरोना व्हायरसची रूप घ्यायला सांगून त्यांच्यामार्फत शहरात नागरिकांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. या हटके आयडिया बद्दल सविस्तर जाणून घ्या..
ढोणे ग्रामीण पोलिस ठाण्याचे सर्कल इन्स्पेक्टर सुधाकर रेड्डी यांनी या कल्पनेविषयी सांगितले की, "कोरोना लॉक डाऊन काळात लोकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यासाठी आम्ही एक हटके ट्रिकी अंमलात आणली आहे, आम्ही यमराज, चित्रगुप्त आणि कोरोना या रूपात कलाकार आणले. आणि त्यांच्यामार्फतच शहरात फिरून लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले जाते. यमराजाच्या वेशातील हे कलाकार लोकांना सूचना देताना “जर कोणी रस्त्यावर आला तर, यमराज पहात आहे आणि तो त्यांना घेऊन जाईल” असे सांगत असतात.
ANI ट्विट
दरम्यान, अशीच कल्पना महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील टाकळी ग्रामपंचायतीने सुद्धा सुरु केली आहे, या ठिकाणी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांची गाढवावरून धिंड काढली जाईल असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे कोरोनाचे संकट आता वेगाने पसरत आहे. सद्य घडीला भारतात 1634 कोरोना रुग्ण आहेत. मागील 12 तासात कोरोनाचे 240 नवे रुग्ण समोर आले आहेत.