आता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चौकीदार टीकेला चोख उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांनी मैं भी चौकीदार ही नवी मोहीम सुरु केली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या चौकीदार टीकेला चोख उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपा नेत्यांनी 'मैं भी चौकीदार' ही नवी मोहीम सुरु केली. यासाठी मोदींसह अनेक भाजपा नेत्यांनी ट्विटवर आपल्या नावापुढे चौकीदार लावले. इतकंच नाही तर भाजपाच्या निवडणूक प्रचार अभियानाची सुरुवातही 'मैं भी चौकीदार' हे गाणे शेअर करत मोदींनी केली. आता चौकीदारची ही लाट फेसबुकवरही पाहायला मिळत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांनी 'मैं भी चौकीदार' या मोहीमेची सुरुवात फेसबुकवरही केली. यासाठी प्रोफाईल फोटो बदलला असून फोटोत मागे अमित शहा आणि पुढे नरेंद्र मोदी दिसत आहेत. फोटोवर 'मैं भी चौकीदार' असे लिहिले आहे.
प्रोफाईल फोटो बदलल्यानंतर तो शेअर करत अमित शहा यांनी लिहिले की, "#MainBhiChowkidar ही मोहीम अधिक बळकट करण्यासाठी मी माझा प्रोफाईल फोटो बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रयत्नांत सहभागी होण्याचे मी सर्वांना आवाहन करतो. तुम्ही देखील तुमचा प्रोफाईल फोटो या फ्रेमसह बदला."
अमित शहा यांची फेसबुक पोस्ट:
अमित शहा यांच्या या प्रयत्नाला सोशल मीडियात भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण मोदींना पाठींबा दर्शवण्यासाठी आपला प्रोफाईल फोटोही बदलत आहेत.