Coronavirus Outbreak In India: कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे केरळ मध्ये 31 मार्च पर्यंत चित्रपटगृह, इयत्ता 7वी पर्यंत शाळा, परीक्षा रद्द
दरम्यान कोच्चिमध्ये (Kochi) विविध मल्याळम सिनेमा संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे.
जगभरात धूमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता भारतामध्येही दहशत निर्माण करत आहे. दरम्यान आज (10 मार्च) सकाळी केरळमध्ये कोरोनाचे 6 नवे रूग्ण आढळल्याने प्रशासन अधिक सजग झाले आहे. आता वाढत्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता केरळमध्ये 31 मार्च पर्यंत सिनेमागृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोच्चिमध्ये (Kochi) विविध मल्याळम सिनेमा संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. आज सकाळी लहान मुलांच्या सुरक्षेसाठी इयत्ता सातवी पर्यंतच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी जाहीर केला होता. दरम्यान या काळात मदरसा, आंगणवाडी, ट्युशन क्लासेसदेखील बंद राहणार आहेत.
सध्या केरळमध्ये 116 जणं निगराणीखाली असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर पोहचली आहे. पथनमथिट्टा, एर्नाकुलम आणि कोट्ट्यम मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारने लोकांचा एकमेकांशी कमीत कमी संबंध यावा यासाठी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 56 आहे. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; केरळ मध्ये 3 वर्षीय मुलाला कोरोना व्हायरसची लागण.
चित्रपट गृह 31 मार्च पर्यंत बंद
शाळा, परीक्षा 31 मार्च पर्यंत रद्द
जगभरात कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या 4000 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात काल 2 जणांना निदान झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुबईहून परतलेल्या या दांम्पत्यामध्ये एकात सौम्य लक्षणं आहेत दुसर्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरस हा शिंक किंवा खोकल्याच्या तुषारांमधून इतरत्र पसरतो आणि त्याचा संसर्ग वाढतोय. त्यामुळे लोकांचा थेट संपर्क टाळण्याचा, पुरेशी स्वच्छता पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.