Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेत 40 हून अधिक खाद्यपदार्थांवर बंदी; यात्रेकरूंना शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याचा सल्ला
तसेच भक्तांना अल्कोहोल, कॅफिन आणि धूम्रपान टाळण्यासही सांगण्यात आले आहे.
आगामी अमरनाथ यात्रेत (Shri Amarnath Yatra) 40 हून अधिक खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच यात्रेकरूंना दिवसातून किमान 5 किलोमीटर चालून शारीरिक तंदुरुस्ती साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही गोष्ट श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने (Shri Amarnath Shrine Board) गुरुवारी जारी केलेल्या हेल्थ अॅडव्हायझरीमध्ये (Health Advisory) समोर आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये पेय, तळलेले आणि फास्ट फूड पदार्थांचा समावेश आहे. दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,880 मीटर उंचीवर असलेल्या बाबा अमरनाथची यात्रा यात्रा 1 जुलै रोजी सुरु होणार आहे.
श्री अमरनाथ श्राइन बोर्डच्या सल्ल्यानुसार, ज्या पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये पुलाव, फ्राईड राईस, पुरी, बथुरा, पिझ्झा, बर्गर, परांठा, डोसा, तळलेली रोटी, ब्रेड-लोणी, क्रीमचे पदार्थ, लोणचे, चटणी, तळलेले पापड, चाऊमीन तसेच इतर तळलेल्या पदार्थांचा समावेश आहे. भाविकांचे आरोग्य लक्षात घेऊन मंडळाने धान्य, कडधान्ये, हिरव्या भाज्या आणि तांदळाच्या काही पदार्थांसह कोशिंबीर या आरोग्यदायी पर्यायांची शिफारस केली आहे. साधारण 40 प्रतिबंधित वस्तूंव्यतिरिक्त सर्व गोष्टींना परवानगी आहे, असे बोर्डाने नमूद केले.
गंदेरबल आणि अनंतनाग जिल्ह्यांचे जिल्हा दंडाधिकारी रणबीर दंड संहितेअंतर्गत योग्य आदेश जारी करतील, ज्यात वर नमूद केलेल्या अन्न पदार्थांच्या उल्लंघनासाठी दंड आकारला जाईल. यात्रा करण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रेत्याकाने आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये पूर्वतयारी म्हणून दररोज सुमारे 4-5 किमी चालणे, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम, योगासने आणि विशेषतः शरीराची ऑक्सिजन कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्राणायाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा: Gujarat: तापीतील मिंधोळा नदीवरील पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला; 15 गावे बाधित, होत आहेत भ्रष्टाचाराचे आरोप)
तसेच यात्रेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचेही आवाहन केले आहे. बोर्डाने हायपोथर्मिया टाळण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ असलेले निरोगी आहार, उबदार पेये आणि उर्जेसाठी नियमित जेवण यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भक्तांना अल्कोहोल, कॅफिन आणि धूम्रपान टाळण्यासही सांगण्यात आले आहे.