Airbus Plans To Hire 5,000 Employees In India: खुशखबर! एअरबस भारतात 5 हजार लोकांना नोकऱ्या देणार; TATA सोबत झाला मोठा करार
एअरबसची भारतातील वाढती उपस्थिती आणि गुंतवणुकीमुळे केवळ रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार नाहीत तर भारतीय विमान वाहतूक उद्योगालाही नवीन उंचीवर नेले जाईल.
Airbus Plans To Hire 5,000 Employees In India: एअरबस (Airbus) या प्रमुख विमान उत्पादक कंपनीने येत्या काही वर्षांत भारतात 5,000 हून अधिक थेट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना जाहीर केली आहे. यासोबतच भारतातून US$ 2 अब्ज किमतीची सेवा आणि सुटे भागही खरेदी करणार आहे. एअरबस इंडियाच्या दक्षिण आशियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रेमी मॅलार्ड यांनी ही माहिती दिली आहे. एअरबस सध्या भारतात सुमारे 3,500 लोकांना थेट रोजगार देते आणि €1 अब्ज किमतीच्या सेवा आणि साहित्य सोर्स करत आहे. नवी दिल्लीतील एअरबस इंडिया आणि दक्षिण आशिया मुख्यालय–प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभात मॅलार्ड म्हणाले की, कंपनीच्या देशासोबतच्या संलग्नतेला नवीन गती मिळत आहे.
एअरबसने सध्याच्या योजनेचा भाग म्हणून भारतात दुसरे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी, एअर इंडियासोबत संयुक्त उपक्रम तयार करण्याबाबतही बोलणी सुरु केली आहेत. याशिवाय, बेंगळुरूमध्ये 5,000 लोकांच्या क्षमतेसह एअरबस कॅम्पस विकसित करण्यासाठी देखील गुंतवणूक केली जाईल. हे एअरबस भारतात C295 लष्करी विमाने आणि H125 हेलिकॉप्टर तयार करेल, जे टाटा समूहासोबत भागीदारीत केले जात आहे. C295 कार्यक्रम संपूर्णपणे भारतातील खाजगी क्षेत्राने बनवलेले पहिले विमान म्हणून इतिहास घडवत आहे.
मेलार्ड यांनी सांगितले की, एअरबस भारतीय संशोधन संस्थांच्या सहकार्याने 'मेड इन इंडिया' सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (एसएएफ) च्या व्यापारीकरणाला समर्थन देत आहे. एअरबस डिफेन्स अँड स्पेसचे सीईओ मायकेल शॉलहॉर्न म्हणाले की, 'मेक-इन-इंडिया' हा कंपनीच्या धोरणाचा गाभा आहे. एअरबस ही युरोपियन एरोस्पेस तंत्रज्ञान कंपनीची विमान निर्मिती करणारी उपकंपनी आहे. ही कंपनी संपूर्ण युरोपमध्ये लक्षणीय ऑपरेशन्ससह, जगातील अंदाजे अर्ध्या जेट विमानांचे उत्पादन करते. (हेही वाचा: Jobs in iPhone Maker Apple: ॲपलमध्ये काम करण्याची संधी; बेंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमधील स्टोअरसाठी होत आहे 400 जणांची नोकरभरती)
दरम्यान, एअरबसची भारतातील वाढती उपस्थिती आणि गुंतवणुकीमुळे केवळ रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार नाहीत तर भारतीय विमान वाहतूक उद्योगालाही नवीन उंचीवर नेले जाईल. 'मेक-इन-इंडिया' उपक्रमाला बळ देऊन भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.