Adar Poonawalla Buys Aberconway House: अदार पूनावाला खरेदी करणार लंडन येथील सर्वात महागडे अॅबरकॉनवे हाऊस
ही मालमत्ता त्या विकत आहेत. ही मालमत्ता पूनावाला कुटुंबाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ब्रिटीश उपकंपनी सीरम लाइफ सायन्सेसद्वारे विकत घेतली जाणार आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) अब्जाधीश सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) हे लंडन (London) येथे एक हवेली घेणार असल्याचे वृत्त आहे. जी हायड पार्क जवळील 25,000 चौरस फूट एबरकॉनवे हाऊस (Aberconway House) आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये या हवेलीची किंमत तब्बल 138 दशलक्ष पाऊंड इतकी असल्याचे म्हटले आहे. ज्याची भारतीय रुपयांमधील किंमत अंदाजे 1,444.4 कोटी रुपये इतकी होते. सांगितले जात आहे की, ही हवेली म्हणजे लंडन शहरातील विकले गेलेले सर्वात महागडे दुसऱ्या क्रमांकाचे घर आहे.
एबरकॉनवे हाऊस हवेलीचा तपशील:
Aberconway House, 1920 च्या दशकातील एक विस्तीर्ण मालमत्ता आहे. जी हाइड पार्कच्या परिसरात वसलेली आहे. सध्या तिची मालकी दिवंगत पोलिश व्यावसायिक जान कुल्झिक यांची मुलगी डोमिनिका कुल्झिक यांच्याकडे आहे. ही मालमत्ता त्या विकत आहेत. ही मालमत्ता पूनावाला कुटुंबाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ब्रिटीश उपकंपनी सीरम लाइफ सायन्सेसद्वारे विकत घेतली जाणार आहे. (हेही वाचा, Adar Poonawalla On Covovax Doses: कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर SII ने तयार केले 5-6 दशलक्ष कोवोव्हॅक्स डोस; अदार पूनावाला यांची माहिती)
रेकॉर्ड ब्रेक व्यवहार:
लक्झरी प्रॉपर्टी एजंट्सच्या म्हणण्यानुसार अबरकॉनवे हाऊससाठीचा करार केवळ लंडनमध्ये विकले जाणारे दुसरे-सर्वात महागडे घर म्हणून प्रस्थापित करत नाही. तर, वर्षातील सर्वात मोठा मालमत्ता व्यवहार म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. नवीन घरांच्या विक्रीत घट होत असताना हे अधिग्रहण लंडनच्या लक्झरी प्रॉपर्टी मार्केटची वैविध्यता दर्शवते. (हेही वाचा -Indian Diet, Tea-Turmeric Lowered Covid Severity: भारतीय आहार, चहा आणि हळदीच्या वापरामुळे कमी झाली कोविडची तीव्रता व मृत्यू- ICMR Study)
सीरम लाइफ सायन्सेसच्या योजना:
पूनावाला कुटुंबाची यूकेमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित होण्याची कोणतीही योजना अद्यापतरी पुढे आली नाही. असे असले तरी, ही हवेली यूकेमध्ये असताना सीरम लाइफ सायन्सेस आणि कुटुंबासाठी आधार म्हणून काम करेल, असे सूत्रांनी सांगितले. फिनान्शियल टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट:
अदार पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविड महामारीदरम्यान अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या सीरम कोविशील्ड लस तयार करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही लस भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिमेसाठी वापरली जात होती.
अदार पूनावाला यांच्याबद्दल:
सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांचा मुलगा अदार पूनावाला यांनी कंपनीच्या दैनंदिन कामकाजाची देखरेख करत करत 2011 मध्ये सीईओ म्हणून भूमिका स्वीकारली. विक्रमी हवेली खरेदी ही पुनावाला यांनी जागतिक लस निर्मिती लँडस्केप मध्ये एक प्रमुख व्यक्ती आणि उद्योजक म्हणून पुढे आल्यानंतर जाकतीक पातळीवर टाकलेले मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे.