कोटा येथील हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात तब्बल 102 मुलांचा मृत्यू; विरोधी पक्षाने चढवला राज्य सरकारवर हल्ला

कोटाच्या सर्वात मोठ्या जेके लोन रुग्णालयात (JJ Lon Children Hospital) गेल्या 2 दिवसात 10 मुलांचा मृत्यू झाला होता. मात्र आता मुलांच्या मृत्यूची संख्या वाढून ती तब्बल 100 वर पोहचली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

राजस्थानच्या कोटा (Kota) येथील रुग्णालयात मागच्या आठवड्यात 48 तासांमध्ये, 10 मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. कोटाच्या सर्वात मोठ्या जेके लोन रुग्णालयात (JJ Lon Children Hospital) गेल्या 2 दिवसात 10 मुलांचा मृत्यू झाला होता. मात्र आता मुलांच्या मृत्यूची संख्या वाढून ती तब्बल 102 वर पोहचली आहे. म्हणजेच डिसेंबर महिन्यात या हॉस्पिटलमध्ये 102 मुले मरण पावली आहेत. त्यानंतर आता मुलांच्या मृत्यूवर राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्ष भाजपने राजस्थान सरकार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्यावर हल्ला चढवला आहे.

भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय याबाबत बोलताना म्हणाले की, ‘एका महिन्यात 102 मुलांचा मृत्यू ही काही छोटी गोष्ट नाही. मात्र याबाबत मुख्यमंत्री आणि मिडियाने डोळे मिटून घेतले आहे. कोटा इतके दूर नाही की सोनिया गांधी आणि राहुल गांधी इथे पोहचू शकत नाहीत.’ दुसरीकडे बसपाच्या प्रमुख मायावती यांनीही गहलोत सरकार आणि प्रियंका गांधी यांना लक्ष्य केले आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी या परिस्थितीला आम्ही गंभीररित्या घेत असल्याचे सांगितले आहे.

30 डिसेंबर रोजी 4 मुले आणि 31 डिसेंबर रोजी 5 मुले मरण पावली. यामागील कारण स्पष्ट करताना, या सर्व मुलांचे जन्मतःच वजन कमी होते त्यामुळे हे घडल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. मात्र इतक्या मोठ्या संख्येने मुलांच्या मृत्यूवरुन भाजपने राज्यातील गेहलोत सरकारविरोधात निषेध सुरू केला आहे. मुलांच्या मृत्यूमुळे जाग्या झालेल्या राजस्थान सरकारने, मंगळवारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयांमधील सर्व वैद्यकीय उपकरणांच्या कार्यात्मक स्थितीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा: कोटाच्या शासकीय रुग्णालयात 2 दिवसांत 10 मुलांचा मृत्यू; मुख्यमंत्री म्हणतात 'ही काही नवीन गोष्ट नाही' (Video))

2018 मध्ये या रुग्णालयात 1005 मुलांचा मृत्यू झाला होता, तर 2019  मध्ये 963 मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी असंवेदनशील विधान करताना, ‘एकाही मुलाचा मृत्यू दुर्दैवी आहे परंतु याआधी वर्षाला 1400, 1500 मुलांचे मृत्यू झाले आहेत. मात्र त्यामानाने यावर्षी कमी म्हणजे सुमारे 900 मृत्यू झाले आहेत.’ असे विधान अशोक गेहलोत यांनी केले आहे.