Independence Day 2020: 'आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी भारतीयांचा मंत्र बनला आहे'; स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाल किल्ल्यावरुन देशावासियांशी संवाद

या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 7.30 वाजता लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

आज संपूर्ण देश 74 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करत आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सकाळी 7.30 वाजता लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. "कोविड-19 च्या संकटात 130 कोटी भारतीयांनी स्वावलंबी होण्याचा आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प मनावर घेतला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत हा सर्वांचा मंत्र बनला आहे." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. "मला देशातील तरुणांच्या क्षमतेवर, आत्मविश्वासावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता ध्येय प्राप्त होत नाही तो पर्यंत थांबायचे नाही," असे म्हणत मोंदींनी पुन्हा एकदा देशावासियांचे मनोधैर्य वाढवले आहे.

"आत्मानिभर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी अनेक आव्हाने, जागतिक स्पर्धा आहेत. परंतु, देशवासियांची शक्ती एकवटली तर त्यातून कोट्यावधी उपाय मिळतील. त्यातून आपल्याला सामर्थ्य मिळेल," असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. परंतु, आधुनिक, नवीन आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून तीन दशकांनंतर नवीन शिक्षण धोरण सादर करण्यात आले आहे. दरम्यान आत्मनिर्भर भारत निर्मितीत महिलांना समान संधी उपलब्ध होतील, असे म्हणत त्यांनी या प्रक्रीयेत महिलांना सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आहे.

"आपण सध्या वेगळ्या काळातून जात आहोत. मी माझ्यासमोर लहान मुलं पाहू शकत नाही. कोरोनाने प्रत्येकाला थांबवलं आहे. कोविडच्या या काळात, कोरोना योद्ध्यांनी 'सेवा परमो धर्म' मंत्र जगला आणि भारतीयांची सेवा केली. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसंच नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा दलासह सुरक्षा जवानांसह कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांची आठवण ठेवण्याचा हा दिवस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ANI Tweet:

तसंच त्यांनी भाषणामध्ये भारतातील कोरोना लसीच्या विकासाची देखील माहिती दिली. भारतातील 3 लसी विकासाच्या टप्प्यात असून शास्त्रज्ञांकडून त्याला हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान जम्मू काश्मीरच्या विकासाचे पर्व सुरु झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसंच गलवान खोऱ्यांतील शहीदांना सलाम करायला मोदी विसरले नाहीत.

विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नॅशनल डिजिटल हेल्थ सिस्टिम'ची घोषणा केली. यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आम्ही आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरु करत आहोत. या मिशनने हेल्थ सेक्टरमध्ये एक उत्क्रांती घडून येईल. या हेल्थ सिस्टम अंतर्गत प्रत्येक नागरिकाला एक हेल्थ आयडी दिला जाईल. त्या हेल्थ आयडीचा वापर करुन प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याविषयी रिपोर्ट्स मेनटेन केले जातील."

यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर भारताचा स्वातंत्र्यदिन सोशल डिस्टंसिंग पाळत साजरा होत आहे. लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींजींच्या स्मृतीला अभिवादन केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.