Shocking! स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी एजंट बनून ग्राहकांना ड्रग्जचा पुरवठा; आरोपीला अटक
पोलिसांनी पकडलेला आरोपी हा आधी स्विगी आणि झोमॅटोसाठी डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत होता आणि पूर्वीची नोकरी सोडल्यानंतर तो गणवेश आणि बॅगचा गैरफायदा घेत होता.
बेंगळुरू (Bengaluru) पोलिसांच्या सेंट्रल क्राइम ब्रँचने (CCB) शुक्रवारी ड्रग्ज (Drugs) वितरणात गुंतलेल्या एका व्यक्तीला पकडले. महत्वाचे म्हणजे अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी ही व्यक्ती स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी एजंटच्या वेशात फिरत होती. बेंगळुरू पोलिसांच्या नार्कोटिक्स स्क्वॉडने जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे की, CCB नार्कोटिक्स स्क्वाडच्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पथकाने व्हाइटफील्ड पोलीस स्टेशन परिसरात कारवाई करून, झोमॅटो आणि स्विगी कंपनीचे टी-शर्ट घातलेल्या एका आरोपीला प्रतिबंधित ड्रग्ससह अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 3 किलो गांजा, 0.14 ग्रॅम वजनाच्या 12 एलएसडी पट्ट्या, एक मोबाईल फोन, एक दुचाकी आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणामध्ये एकूण 2 आरोपी सामील आहेत. यातील पहिला आरोपी हा बिहारचा असून सध्या तो फरार आहे. हा आरोपी दुसऱ्या आरोपीला ज्यांना ड्रग्जचा पुरवठा करायचा आहे अशा ग्राहकांची नावे व ठिकाणांची माहिती पुरवायचा.
तसेच ड्रग्जचा पुरवठा करताना कोणते कपडे घालायचे हेही सांगायचा. त्याच्या सांगण्यावरून दुसरा आरोपी स्विगी किंवा झोमॅटो डिलिव्हरी एजंटचे कपडे घालून स्विगी किंवा झोमॅटोच्या बॅगमधून ड्रग्जचा पुरवठा करत असे. CCB नार्कोटिक्स टीमने सांगितले की, दुसऱ्या आरोपीला ज्या व्यक्तींना ड्रग्स पुरवायचे होते त्यांच्या ओळखीबद्दल काहीही माहिती नव्हती. (हेही वाचा: बिहारमध्ये बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 77 वर; NHRC ने सरकारला बजावली नोरीस)
पोलिसांनी पकडलेला आरोपी हा आधी स्विगी आणि झोमॅटोसाठी डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत होता आणि पूर्वीची नोकरी सोडल्यानंतर तो गणवेश आणि बॅगचा गैरफायदा घेत होता. दोन्ही आरोपी बिहारचे रहिवासी असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.