'पोलिओ डोस' दिल्याने 9 महिन्याच्या मुलीचा मृत्यू? कुटुंबियांच्या आरोपामुळे उत्तर प्रदेश मध्ये खळबळ

पोलिओचं औषध दिल्यानंतर सूर्य कुमार शुक्ला यांच्या 9 महिन्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : You Tube)

भारत पोलिओमुक्त करण्यासाठी मागील दशकभरापासून देशभरात खास मोहीम राबवली जात आहे. कलाकारांपासून आरोग्य संस्थेमध्ये काम करणार्‍यांनी अनेकांनी बालकांना पोलिओचा डोस मिळावा याकरिता प्रयत्न केले आहेत. मात्र आज एका चिमुकल्याच्या पोलिओ डोस (Polio Drops) घेतल्यानंतर मृत्यू झाल्याच्या धक्कादायक बातमीनंतर आता पोलिओ डोस सुरक्षित का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यात सम्भू नगर परिसरात घरा घरात जाऊन पल्स पोलिओच्या उपक्रमा अंतर्गत 'पोलिओ'चा डोस दिला जातो. या मोहिमेदरम्यान औषध दिल्यानंतर सूर्य कुमार शुक्ला यांच्या 9 महिन्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली. ईशिता असे या मुलीचं नावं आहे. ईशिताच्या कुटूंबीयांनी 'पोलिओचा डोस' घेतल्यानंतर तिची प्रकृती ढासळल्याचं सांगितलं. काही वेळातच तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

इशिताच्या परिवाराकडून संताप व्यक्त झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तात्काळ एक समिती नेमण्यात आली आहे. यामधील डॉक्टर ईशिताच्या पोस्ट मार्टम रिपोर्टचा अहवाल सादर करणार आहेत. खरंच ईशिताचा मृत्यू पोलिओच्या डोसमुळे झाला का? याचा तपास करणार आहे. इशिताचा परिवाराच्या आरोपात तथ्य असल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असे बांदाचे डीएम एच लाल यांनी सांगितले आहे.