मलाला यूसुफजईला गोळ्या घालणारा दहशतवादी एहसानुल्ला एहसान पाकिस्तानच्या तुरुंगातून पळाला; 6 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) प्रवक्ता एहसानुल्ला एहसान ज्याने मलाला यूसुफजईला गोळ्या घातल्या होत्या, तसेच पेशावर लष्कराच्या शाळेत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी जो जबाबदार होता, तो पाकिस्तानच्या लष्कराच्या तुरूंगातून पळाला.
कर्नाटक विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेल्या, ऋषिकेश देवडीकरला महाराष्ट्र एटीएसने ट्रान्झिट रिमांडवर राज्यात आणले. आज त्याला नालासोपारा शस्त्र प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात हजर केले होते. कोर्टाने त्याला 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जम्मू-काश्मीरः नॅशनल कॉन्फरन्स लीडर ओमर अब्दुल्ला आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्यावर पब्लिक सेफ्टी कायदा (पीएसए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज डोंबिवलीमधील गुलाबी रस्त्याची पाहणी केली, त्याची कारणे समजून घेतली. जे घातक कारखाने आहेत त्यांच्यासंदर्भात तीन टप्प्यांत कार्यवाही करण्याचे ठरवले आहे. तसेच केमिकल इंडस्ट्रीला नागरी वस्तीपासून दूर हलवण्यासंदर्भात 15 दिवसांत सर्व्हेक्षण करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावरील केंद्र सरकारच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असून या प्रकरणातील आरोपींच्या फाशीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज डोंबिवली शहरात तेथील महापौर आणि अन्य पदाधिका-यांसोबत बैठक घेतली. त्यांनी येथील प्रदूषणाबाबत मोठी घोषणा केली आहे. डोंबिवलीतील प्रदूषण पाहता येथील कारखान्यांची वर्गवारी करून तीन टप्प्यांत कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच येथील काही वस्त्या शहरापासून दूर नेणार असून येथील कच-याची योग्य रित्या विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कल्याण-डोंबिवलीला स्वच्छ शहर बनविण्यासाठी 100 कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यसभेत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांनी तसेच अन्य विरोधकांनी सभात्याग केला. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात मोदी सरकार काळातील विकासाची माहिती देत असताना काँग्रेस पक्षावरही जोरदार टीका केली.
भिवंडीतील रुंगठा डाईंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. Tv9 मराठी ने दिलेल्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीचे लोळ खूप दूरवर पसरल्याचे सांगितले जात आहे.
देशात निराश होण्याचे काही कारण नाही. अर्थव्यवस्थेच्या मूलभूत पॅरामीटर्सपैकी आजही देशाची अर्थव्यवस्था बळकट, मजबूत असून पुढे जाण्याचे सामर्थ्य तिच्यात आहेः पंतप्रधान नरेंद्र मोदी
कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीर चा झपाट्याने विकास होत आहे असे नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले. तसेच 5 ऑगस्ट 2019 हा दिवस दहशतवाद पसरवणा-यांसाठी काळा दिवस होता असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईच्या पुर्नविकासाठी दुबईच्या कंपन्या येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. गरीबांना डोळ्यासमोर ठेवून या घरांची निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शीना बोरा हत्या प्रकरणात पीटर मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र या जामीनावर 6 आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला. मंजूर झालेल्या जामीनावर न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली.
पनवेल येथे दुन्द्री गावात मंगळसूत्र चोरल्याच्या आरोपावरून एका महिलेची जाळून हत्या करण्यात आल्याचे समजतेय. या महिलेला जाळून झाडाला लटकवण्यात आले होते. या घटनेचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन केले, यावरून राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना मोदी देशातील मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करून फक्त काँग्रेस, पाकिस्तान, नेहरू याच मुद्द्यांवर भाष्य करतात. सध्या देशात बेरोजगारी ही मूळ समस्या आहे पण त्याविषयी आपल्या भाषणात मोदींना किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बोलणे टाळले असा आरोप सुद्धा राहुल यांनी लगावला आहे.
डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात प्रदूषणामुळे रस्ते गुलाबी झाले होते, यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. याच प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोंबिवली येथे भेट देणार आहेत. यावेळी कल्याण ग्रामीण चे आमदार राजू पाटील यांनी प्रदूषण पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यानी येणे हे दुर्दैव आहे अशा शब्दात खंत व्यक्त केली.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे सोमवारी एका प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यातील पीडितेची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मेडिकल बुलेटिन मधून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची मिळकत वाढावी हेच ध्येय ठेवून सरकारने काम केले आहे असे म्हणताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामाचा पाढा वाचून दाखवला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी 56 हजार कोटींचा निधी दिला आहे, तसेच उच्चतम समर्थन मूल्य (MSP) ची प्रलंबित समस्या आम्ही सोडवली, 2014 च्या आधी असणाऱ्या कृषी अर्थसंकल्पात सरकारने पाच पटीने वाढ केली आहे. इत्यादी कामे मोदींनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत निवेदन करत आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत निवेदन करत आहेत. यावेळी सरकारच्या कामाचा पाढा वाचताना North- East मध्ये सूर्य लवकर उजाडायचा मात्र अंधार मिटत नव्हता, पण आता सरकारतर्फे सुरु असणाऱ्या कामामुळे या भागात नवीन सकाळ आली आहे, फक्त तुम्ही चष्मा बदलला तर हा प्रकाश तुम्हाला दिसून येईल. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे.
सिल्लोड येथील जळीतकांडातील महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला आगीत 95 टक्के भाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते यास अटक केली असून, त्याला 10 फेब्रुवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोषने पीडित महिलेस मारहाण करून रॉकेल ओतून पेटवले आणि घराची कडी लावून पळून गेला होता. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवून पीडितेला घाटी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी उपचाराच्य दरम्यान तिचा मृत्यू झाला.
राज्यातील हवामान पाहायला गेल्यास नागपुरात अवकाळी पावसाची रिपरिप सुरु असल्याने पुन्हा हवेतील गारठा वाढला आहे, सोबतच विदर्भाच्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे कापूस, हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झाल्याचं समजतंय.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
आंतराराष्ट्रीय स्तरावर कोरोना व्हायरसचे सावट अद्याप कायम आहे, चीन मध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 560 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी फिलिपाइन्स मध्ये सुद्धा एका व्यक्तीचा कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. भारतात सुद्धा केरळ मध्ये या व्हायरसचे तीन रुग्ण आढळले आहेत मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)