6EBagport: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; IndiGo ने सुरु केली Door-to-Door Baggage Transfer Service; जाणून घ्या काय असेल शुल्क

टर्मिनलमध्ये अतिरिक्त सहाय्य करण्यासोबतच कार्टरपोर्ट त्यांचे सामान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी संपर्कविरहितपणे पोहोचवेल.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

आता हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घरून विमानतळावर सामान घेऊन जाणे व विमानतळावरून ते घरी आणणे याबाबत चिंता करण्याची गरज नाही. इंडिगोने (IndiGo) हवाई प्रवाशांसाठी एक विशेष सेवा सुरू केली आहे. इंडिगोने सांगितले की, त्यांनी दिल्ली आणि हैदराबाद येथे डोअर-टू-डोअर बॅगेज ट्रान्सफर सर्व्हिस (Door-to-Door Baggage Transfer Service) सुरू केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांचे सामान सुरक्षितपणे पोहोचवले जाते. इंडीगो एअरलाईनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कार्टर पोर्टरच्या भागीदारीत लवकरच मुंबई आणि बंगळुरू येथे '6 ई-बॅगपोर्ट' नावाची ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना कार्टर पोर्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष वर्धन म्हणाले की, सर्वप्रथम प्रवाशांच्या घरातून सामान उचलले जाईल, यामुळे चेक-इन काउंटर आणि सुरक्षा तपासणीची प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होईल. जर प्रवाशाला विमानतळावरून घरी न जाता इतर कोणत्या ठिकाणी जायचे असले तरी, प्रवाशाचे सामान त्याने नमूद केलेल्या ठिकाणी पोहोचवले जाईल. यामध्ये प्रति नग 5 हजार रुपये विमा संरक्षणदेखील देण्यात आले आहे. इंडिगोने या डोअर-टू-डोअर सुविधेस '6 ईबॅगपोर्ट' असे नाव दिले आहे. यासाठी प्रवाशाला ट्रिपच्या 24 तास आधी बुकिंग करावे लागेल. तसेच, याचे शुल्क केवळ 630 रुपये असेल.

एअरलाइन्स कंपनीने म्हटले आहे की, या सुविधेमुळे प्रवाशांना चिंतामुक्त प्रवास करता येईल. टर्मिनलमध्ये अतिरिक्त सहाय्य करण्यासोबतच कार्टरपोर्ट त्यांचे सामान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी संपर्कविरहितपणे पोहोचवेल. (हेही वाचा: इस्रो मध्ये 'या' पदांसाठी नोकर भरती, येत्या 21 एप्रिल पर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज)

दरम्यान, देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने गुरुवारी सांगितले की, त्यांनी 28 मार्चपासून प्रादेशिक संपर्क योजना उडान (RCS-UDAN Scheme) अंतर्गत 14 नवीन उड्डाणे सुरू केली आहेत. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, भुवनेश्वर-अलाहाबाद, भुवनेश्वर-वाराणसी, भोपाळ-अलाहाबाद, दिब्रूगड-दिमापूर, शिलांग-अगरताला आणि शिलांग-सिलचर या विविध मार्गांवर ही उड्डाणे सुरू केली आहेत.



संबंधित बातम्या