Coronavirus Update in India: भारतात 14,821 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 4,25,282 वर
महाराष्ट्रात 1,32,075 नवी दिल्लीत 56,746 रुग्ण आहेत.
भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूने ठाण मांडले असून दिवसागणिक देशात वाढत चाललेल्या रुग्णांची संख्या देशातील भयाण चित्र समोर आणत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 14,821 रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 लाख 25 हजार 282 वर जाऊन पोहोचली आहे. त्यासोबतच काल (21 जून) दिवसभरात 445 रुग्ण दगावले असून देशात मृतांचू एकूण संख्या 13,699 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. त्यासोबतच सद्य स्थितीत 1,74,387 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत 2,37,196 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
भारतात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून त्यापाठोपाठ नवी दिल्ली, तमिळनाडू, गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 1,32,075 नवी दिल्लीत 56,746 रुग्ण आहेत.
कोविड-19 चा प्रभाव जगभरात असून कोरोना बाधितांची संख्या आणि त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. तर कोरोनाग्रस्तांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक चौथा आहे. दुसरीकडे महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक आढळून आला आहे. तसेच 31 ते 40 या वयोगातील कोरोना रुग्णांची प्रमाण हे सर्वाधिक आहे.