महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल' सज्ज; MPCB आणि पर्यावरण मंत्रालयाला मिळणार राज्यभर तांत्रिक मदत
संस्थेला राज्य पातळीवर पर्यावरण मंत्रालयाशी संलग्न 'नोडल एजन्सी' म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी 'ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल महाजन यांनी पर्यावरण मंत्री तसेच प्रधान सचिव जयश्री भोज यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
महाराष्ट्रातील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामाला गती देण्यासाठी 'ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशन'ने राज्यभरात आपले व्यापक जाळे तयार केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या संस्थेची तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अनुभवी टीम सज्ज झाली आहे. या राज्यस्तरीय नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि हाय पॉवर कमिटीला सर्वतोपरी तांत्रिक मदत केली जाणार आहे.
या पत्राची तात्काळ दखल घेत प्रधान सचिव जयश्री भोज यांनी सदर पत्र पुढील आवश्यक कारवाईसाठी MPCB सायनचे सदस्य सचिव यांच्याकडे वर्ग केले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात तांत्रिक तज्ज्ञांची टीम उपलब्ध
ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशनकडे प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक असलेली उच्चशिक्षित, अनुभवी व पूर्ण खात्रीशीर माहिती असणारी तांत्रिक टीम उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, ही टीम संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असून, MPCB बोर्ड आणि राज्य सरकारला पूर्णपणे विनामूल्य (मोफत) तांत्रिक सहकार्य करण्यास तयार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात टीम उपलब्ध असल्याने स्थानिक पातळीवरील औद्योगिक, नागरी तसेच इतर प्रदूषणाशी संबंधित समस्यांचे अचूक सर्वेक्षण, अभ्यास आणि उपाययोजना करणे सरकारला अधिक सोपे होणार आहे. शासकीय यंत्रणा आणि सेवाभावी तांत्रिक संस्था एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राला प्रदूषणमुक्त करण्यासाठी हे एक ठोस आणि महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.