PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव; नीरजच्या भाल्याची 1 कोटी तर सिंधूची रॅकेट, राणी रामपालच्या हॉकीची आहे इतकी किंमत
सिंधूच्या रॅकेटची किंमत 80 लाखापासून सुरु होते तर सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्यावर 1 कोटीपासून बोली लावली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे आणि आजचा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त, सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधानांना भेटवस्तू (PM Modi Gifts) आणि स्मृतीचिन्हांचा ई-लिलाव आयोजित केला आहे. क्रीडा क्षेत्रासाठी 2021 वर्ष भारतासाठी शानदार राहिले आहे. ऑलिम्पियन (Olympics) आणि पॅरालिम्पियन (Paralympics) खेळाडूंनी पदक मिळवून टोकियो खेळतुन मायदेशी परतले. परतल्यावर खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यथोचित सन्मानित करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात खेळाडूंनी त्यांना त्यांची काही भेट देखील दिल्या ज्याचा आता सरकारला मोठा पैसा मिळवून देण्यासाठी फायदा होणार आहे. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पीएम मोदींना भाला भेट दिला ज्याचा वापर करून त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर पीव्ही सिंधूने (PV Sindhu) त्यांना बॅडमिंटन रॅकेट दिले ज्यासह तिने कांस्यपदक जिंकले. हे सर्व सरकारने ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी ठेवली आहेत. (KBC 13: गोलकीपर PR Sreejesh समोर अमिताभ बच्चन यांचा हॉकीचा खेळ; पहा मजेशीर व्हिडिओ)
मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, लिलावात पदक विजेते ऑलिंपियन आणि पॅरालिम्पियन खेळाडूंचे क्रीडा उपकरणे, अयोध्या राममंदिराची प्रतिकृती, चार धाम मंदिर, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर, मॉडेल, शिल्प, चित्रे, अंगवस्त्र आणि 1300 अशा वस्तू लिलावात उपलब्ध आहेत. लिलावात 10 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकते आणि याचा उपयोग गंगा नदी संरक्षण आणि कायाकल्प करण्याच्या उद्देशाने नमामी गंगे मिशनवर वापरले जातील. दरम्यान खेळाडूंनी दिलेल्या वस्तूंच्या लिलावाबद्दल बोलायचे तर दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सिंधूच्या रॅकेटची किंमत 80 लाखापासून सुरु होते तर सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्यावर 1 कोटीपासून बोली लावली जाईल. तसेच भारतीय बॉक्सर Lovlina Borgohain च्या बॉक्सिंग ग्लोव्हजची किंमत 80 लाख, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालच्या स्टिकची किंमत देखील 80 लाखांपासून सुरु होते. निळ्या रंगाच्या हॉकी स्टिकवर पांढऱ्या रंगाने लिहिलेला रक्षक नावाचा लोगो आहे.
उपकरणांमधून कोट्यवधी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. पॅरालिम्पिकमध्ये अवनी लाखेरा यांनी परिधान केलेल्या टी-शर्टची मूळ किंमत 15 लाख रुपये आहे. तर एक स्टोल ज्यावर टोकियो ऑलिम्पिक क्रीडापटूंनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, त्याची मूळ किंमत 90 लाख रुपये आहे. पॅरा खेळांमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या सुमित अँटिलच्या भालाची मूळ किंमत देखील 1 कोटी रुपये आहे.