बीफ विकल्याच्या संशयावरून 68 वर्षीय व्यक्तीला जमावाकडून मारहाण; जबरदस्तीने डुकराचे मांस खायला लावले (Video)
इतकेच नाहीत तर त्यानंतर या व्यक्तीला जबरदस्तीने डुकराचे मांसही खाऊ घालण्यात आले.
आसाम (Assam)च्या विश्वनाथ जिल्ह्यामध्ये बीफ (Beef) विकत असल्याच्या संशयावरून एका 68 वर्षीय व्यक्तीला जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाहीत तर त्यानंतर या व्यक्तीला जबरदस्तीने डुकराचे मांसही खाऊ घालण्यात आले. शौकत अली (Shaukat Ali) असे या व्यक्तीचे नाव असून, 7 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, यामध्ये शौकत अली आपल्याला सोडून देण्यात यावे यासाठी विनवणी करताना दिसून येत आहे. मारहाण करणाऱ्या जमावावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत असुदुद्दीन औवेसी यांनीही खेद व्यक्त केला आहे.
सुरुवातीला या जमावाने शौकत यांना मारहाण केली, नंतर त्यांना डुकराचे मांस खाऊ घालण्यात आले, दरम्यान तुम्ही बीफ विक्री का करता? तुमच्याकडे बीफ विक्रीचा परवाना आहे का? अशी जमावाकडून त्यांची उलटतपासणी सुरु झाली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत अली एका छोटा व्यावसायिक असून तो गेल्या 35 वर्षांपासून या भागात एक भोजनालय चालवतो. सध्या शौकल अली यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या बाबत शौकत अली यांनी तक्रार दाखल केली आहे, त्यानुसार पोलिसांनी व्हिडीओच्या मदतीने आरोपींवर केस दाखल केली आहे. पोलीस या घटनेची तपासणी करत आहेत. याधीही देशभरात गोरक्षकांनी याच मुद्द्यावरून धुमाकूळ घातल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. विरोधकांकडून सरकारच्या आशीर्वादानेच या घटना घडत असल्याचा आरोप केला जात आहे.