CM Oath Ceremony: मेघालय-नागालँड 7 मार्चला तर त्रिपुरामध्ये 8 मार्चला होणार शपथविधी; पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित

त्रिपुरामध्ये, माणिक साहा (Manik Saha) पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणि नागालँडमध्ये, एनडीपीपी सुप्रीमो नेफियू रिओ पाचव्या टर्मसाठी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.

Conrad Kongkal Sangma, Manik Saha, PM Modi (PC - Facebook)

CM Oath Ceremony: मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. मेघालयमध्ये 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शपथविधी होणार आहे. तर नागालँडमध्ये 7 मार्च रोजी दुपारी 1.45 वाजता आणि त्रिपुरामध्ये 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले.

या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करणार आहे. मेघालयातील नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) प्रमुख कोनराड के. संगमा (Conrad Kongkal Sangma) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. त्रिपुरामध्ये, माणिक साहा (Manik Saha) पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणि नागालँडमध्ये, एनडीपीपी सुप्रीमो नेफियू रिओ पाचव्या टर्मसाठी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. (हेही वाचा -Assembly Elections Results 2023: तीन राज्यांतील विधानसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार; म्हणाले...,)

कॉनराड संगमा यांनी शुक्रवारी मेघालयचे राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली आणि राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी 32 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. संगमा म्हणाले, त्यांना भाजप, एचएसपीडीपी आणि दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. नवीन सरकार 7 मार्च रोजी शपथ घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास संमती दिली आहे.

दरम्यान, मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभेच्या 59 जागांसाठी मतदान झाले होते. गुरुवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ज्यामध्ये NPP 26 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. यूडीपीने 11 जागा जिंकल्या, तर काँग्रेस आणि टीएमसीने प्रत्येकी पाच आणि भाजपने दोन जागा जिंकल्या.

तथापी, त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 60 जागांपैकी 32 जागा जिंकल्या आहेत. तर त्यांचा मित्रपक्ष आयपीएफटीने एक जागा जिंकली आहे. मुख्यमंत्री माणिक साहा यांनी शुक्रवारी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे आपल्या सरकारचा राजीनामा सुपूर्द केला. ते म्हणाले की, नवीन सरकार 8 मार्च रोजी शपथ घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजपचा विजय

नागालँडमधील 60 सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात NDPP-भाजपने 37 जागा जिंकल्या. त्यापैकी एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने सात, एनपीएफने पाच आणि नागा पीपल्स फ्रंट, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) आणि आरपीआय (आठवले) प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. जनता दल (युनायटेड) एक जागा जिंकली आहे, तर चार अपक्ष विजयी झाले आहेत.