महाराष्ट्राचा आणि भारताचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पवार घराण्याचा 'इतिहास'; काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी
आज पवार खानदानाच्या तीन तीन पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत. पण काय आहे या समस्त पवार कटुंबाचा इतिहास? चला जाणून घेऊया.
केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाचा राजकीय इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा एक नाव त्यात वारंवार येत राहील, ते म्हणजे शरद पवार (Sharad Pawar). या नावाला एक प्रकारचं वलय प्राप्त आहे. असंख्य कार्यकर्ते आणि तेवढेच विरोधक लाभलेला असा हा नेता. पण एक गोष्ट मात्रपवारांबद्दल मान्य करायलाच हवी की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकता किंवा त्यांचा राग करू शकता, पण तुम्ही त्यांना कधीच दुर्लक्षू शकत नाही. महाराष्ट्रासाठी त्यांचं कार्यच इतकं आहे. आज पवार खानदानाच्या तीन तीन पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत. पण काय आहे या समस्त पवार कटुंबाचा इतिहास? चला जाणून घेऊया.
शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जरी काँग्रेस मधून केली असली तरीही त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार या मात्र शेकाप मध्ये होत्या. आईने केलेल्या संस्कारांमुळेच समस्त पवार कुटुंबीय आधीपासूनच सत्याची कास धरण्याचे आणि समाजवादी, साम्यवादी विचारांचे संस्कार झाले. त्यामुळेच श्रद्धा अंधश्रद्धा या भानगडीत न पडता क्रियाशील राहण्याकडे त्यांचा कल अधिक होता. सामाजिक कार्याचा वारसा त्यांना आईकडूनच मिळाला. (हेही वाचा. भाजपला धक्का: काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो)
शरद पवारांच्या पिढीत केवळ ते एकटेच आईच्या पावलावर पाय ठेऊन राजकारणात आले, तर बाकीचे बंधू शेती आणि इतर उद्योगात रमले. गोविंदराव आणि शारदाबाई यांना एकूण ५ मुलं होती. अप्पासाहेब, अनंतराव, शरद, प्रतापराव आणि मुलगी सरोज. पुढच्या पिढीतुन राजकारणात आलेले अजित पवार (Ajit Pawar)हे अनंतरावांचे चिरंजीव तर सुप्रिया सुळे (Supriya Sule) या शरद पवारांच्या कन्या , तिसऱ्या पिढीतील रोहित हा अप्पासाहेबांचा नातू म्हणजेच अजित पवारांचा पुतण्या आहे. अजित पवारांना पार्थ आणि जय अशी दोन अपत्य आहेत. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास हे व्यवसायात आहेत तर प्रतापराव पवार यांचे चिरंजीव अभिजीत पवार हे सकाळ मीडिया ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत. आधी अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील ह्या देखील सकाळचं व्यवस्थापन पाहायच्या. पण कालांतराने त्या तिथून बाहेर पडल्या. तर दुसरीकडे रोहितचे वडील राजेंद्र यांनी कृषी व्यवसायात लक्ष केंद्रित केलं.
तर हा आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या चेहरामोहरा आमूलाग्र बदल घडवून आणलेल्या समस्त पवार घराण्याचा 'इतिहास'.