अखेर Jet Airways ची सेवा बंद, काल रात्री घेतले शेवटच्या विमानाने उड्डाण; 10 मे रोजी होणार बोली प्रक्रियेवर निर्णय

काल रात्री 10.20 वाजता Jet Airways च्या शेवटच्या 9W-2502 विमानाने अमृतसर ते मुंबई असे उड्डाण केले, आणि 25 वर्षांनतर ही सेवा बंद झाली.

File image of Jet Airways | (Photo Credits: Pixabay)

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेज (Jet Airways) कंपनीने अखेर बुधवारी, 17 एप्रिल रोजी आपली सेवा तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली. तब्बल 8 हजार कोटी कर्ज असलेल्या या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगारही थकवले आहेत. त्यात कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल (Naresh Goyal) आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने कंपनीला वाली राहिलाच नव्हता. काल रात्री 10.20 वाजता जेटच्या शेवटच्या 9W-2502 विमानाने अमृतसर ते मुंबई असे उड्डाण केले, आणि 25 वर्षांनतर ही सेवा बंद झाली.

कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन थकवल्यामुळे सोमवारी (15 एप्रिल) सकाळी 10 वाजल्यापासून उड्डाणे थांबविण्याचा निर्णय जेटच्या कर्मचाऱ्यांनी घेतला होता. मात्र जेट व्यवस्थापन व स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये बैठक होणार असल्याचे समजल्याने हे आंदोलन पुढे ढकलले. या बैठकीनंतर बँकेने 500 कोटींचा निधी देण्यास नकार दिला, त्यामुळे शेवटची आशाही मावळल्याने कंपनीने आपली सेवा बंद केली. आता जेट एअरवेजच्या बोली प्रक्रियेबाबत 10 मे रोजी निर्णय होणार आहे. (हेही वाचा: जेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा)

कंपनीने एक प्रसिद्धिपत्रक जाहीर करून यासंदर्भात माहिती दिली. तसेच जेट एअरवेजने सर्व प्रवासी व संबंधितांना एसएमएस व मेल करून सेवा संपुष्टात आल्याबाबत माहिती दिली आहे. एकेकाळी जेटकडे असणाऱ्या 120 विमानांद्वारे तब्बल 600 उड्डाणे चालायची. मात्र 26 बँकांचे कर्ज असणारी ही कंपनी आता दिवाळखोरीकडे मार्गस्थ झाली असल्याने बंद करण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांत बंद पडलेली जेट एअरवेज ही देशातील सातवी नागरी हवाई वाहतूक कंपनी आहे. यापूर्वी एअर पेगासस, एअर कोस्टा, एअर कार्निव्हल, एअर डेक्कन, एअर ओडिशा व झूम एअर या विमानसेवा देणाऱ्या कंपन्या बंद पडल्या आहेत. जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी कंपनीला वाचवण्यासाठी आर्थिक मदत म्हणून सुरुवातीला 1500 कोटी रुपयांची मागणी स्टेट बँकेकडे केली होती.मात्र, ही मागणी पूर्ण झाली नसल्याने आणीबाणीची मदत म्हणून 500 कोटी रुपये मिळावेत अशी मागणीही केली, मात्र बँकेने ही मागणीही धुडकावून लावली.