जेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा

25 वर्षांपूर्वी नरेश गोयल यांनी पत्नी अनितासह जेट एअरवेजची स्थापना केली होती.

नरेश गोयल (Photo Credit: Wikimedia commons/PTI)

गेल्या काही महिन्यांपासून जेट एअरवेज (Jet Airways) कंपनीला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. कर्जामुळे कंपनीचे अक्षरशः दिवाळे निघाले असताना, कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल (Naresh Goyal) आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 25 वर्षांपूर्वी नरेश गोयल यांनी पत्नी अनितासह जेट एअरवेजची स्थापना केली होती. नरेश गोयल हे पदावरून दूर झाल्यानंतर आता जेटच्या कर्जपुरवठादारांच्या संघटनेचे सदस्य त्यांच्याकडील 51 टक्के भागीदारीचे एअरलाइन्समध्ये विलिनीकरण करू शकतात. त्यांनतर जेटसाठी नव्या खरेदीदाराचा शोध सुरु होईल.

या कंपनीवरील कर्ज इतके वाढले होते की, कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही शक्य नव्हते. काही दिवसांपूर्वी, 'गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पगार मिळालेला नाही. कृपया याकडे लक्ष द्या', अशी विनंती करणारे पत्र 'जेट एअरवेज'च्या वैमानिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लिहिले होते. त्यामुळे जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याची सूचना स्टेट बँकेने प्रवर्तक नरेश गोयल तसेच त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना केली होती.

जेटच्या विमानसेवांची संख्या दरदिवशी 650 होती. ती संख्या आता रोडावली असून आता दररोज केवळ 140 फेऱ्याच होत आहेत. जेट एअरवेजला कर्जबाजारी होण्यापासून वाचवावे, असा आदेश केंद्र सरकारने सरकारी बँकांना दिला आहे. जेटला या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज मिळू शकते. (हेही वाचा: Jet Airways धमाकेदार ऑफर्स Domestic आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तिकिट दरात थेट 50% Discount)

जेट एअरवेज सध्या एक अब्ज डॉलर (सुमारे 6895 कोटी) इतके कर्ज आहे. जेट एअरवेजच्या डोक्यावर सध्या एकूण 26 बँकांचे कर्ज आहे. त्यातील काही बँका खासगी आहेत तर काही बँका विदेशी आहेत. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओव्हरसीस बँक, इलाहाबाद बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचेही जेट एअरवेजवर कर्ज आहे. आता या यादीत एसबीआय आणि पीएनबीचे नावही जोडले गेले आहे.