Jammu & Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; 2 जवानांसह 4 जण जखमी

दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील लाल चौकात सुरक्षा जवानांवर हा ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यासंदर्भात काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे.

Grenade Attack in Srinagar (PC - ANI)

Jammu & Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये आज दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात (Grenade Attack) 2 जवानांसह 4 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील (Srinagar) लाल चौकात सुरक्षा जवानांवर हा ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यासंदर्भात काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे.

काश्मीर विभागीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील प्रताप पार्क जवळील लाल चौकात सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली होती. दरम्यान याच ठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान आणि दोन नागरिकांसह चौघे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - जम्मू-श्रीनगर महामार्गावर चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा)

दरम्यान, जम्मू-श्रीनगर महामार्गावर नगरोटा येथील बान टोल प्लाझाजवळ शुक्रवारी पहाटे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत भारतीय जवानांना 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं. भारतीय जवानांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवला होता. या ट्रकमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात 1 जवान जखमी झाला होता. भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले होते.