‘मिशन शक्ती’ बाबत ISRO चा खुलासा, कचरा 6 महिन्यात जळून नष्ट होईल; NASA ने व्यक्त केली होती भीती
‘भारताच्या ‘मिशन शक्ती’मुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढच्या सहा महिन्यात जळून नष्ट होईल’, असे इस्रो अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी म्हटले आहे.
नुकतीच भारताची ‘मिशन शक्ती’ (Mission Shakti) मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेंतर्गत भारताने अवकाशात उपग्रह पाडण्याचे काम केले. या मोहिमेद्वारे भारत शत्रू राष्ट्राचा उपग्रह पाडण्याची क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला. मात्र यावर नासा (NASA) ने चिंता व्यक्त केली होती. भारताने पाडलेल्या उपग्रहाचे जे तुकडे झाले आहेत ते धोकादायक आहेत असे नासाकडून सांगण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना, ‘भारताच्या ‘मिशन शक्ती’मुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढच्या सहा महिन्यात जळून नष्ट होईल’, असे इस्रो अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी म्हटले आहे.
भारताने हा उपग्रह पाडल्याने त्याचे 400 तुकडे झाले आहेत, जे की अंतराळाच्या कक्षेत तसेच फिरत राहणार आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) आणि त्यामध्ये राहणाऱ्या अंतराळवीरांना धोका निर्माण झाला आहे. असे नासाने सांगितले होते. मात्र आता हा कचरा पुढील सहा महिन्यात पूर्णपणे जळून नष्ट होईल, असे इस्रोने सांगितले आहे. मात्र चीनकडून निर्माण झालेला कचरा 2007 पासून तसाच अंतराळात फिरत आहे.
भारताने अंतराळात 300 किमी उंचीवर चाचणी केली. तिथे हवेचा दाब खूपच कमी असतो. परंतु, तो कचरा जाळून नष्ट करण्यास पुरेसा आहे, असे तपन मिश्रा यांनी नमूद केले. (हेही वाचा: भारताची 'मिशन शक्ती' मोहीम 'अतिशय धोकादायक', पाडलेल्या उपग्रहाच्या तुकड्यांचा अंतराळात धोका: नासा)
दरम्यान, डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही.के. सारस्वत यांनीही नासाने केलेल्या दाव्याला काही आधार नसल्याचे म्हटले आहे. क्षेपणास्त्र चाचणीमुळे झालेले तुकडे हे फार काळ अंतराळात टिकणारे नाहीत. तसेच चाचणीनंतर 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या या तुकड्यांना गती किंवा ऊर्जा न मिळल्याने ते पृथ्वीच्या कक्षेत येऊन जळून नष्ट होतील, असे सारस्वत यांनी स्पष्ट केले.