TRAI: घरबसल्या निवडा तुमच्या आवडत्या वाहिन्या, ट्रायने लॉन्च केले TV Channel Selector App
प्रयत्न केला जात आहे की, इतर सेवादात्यांनाही या माहितीसोबत जोडले जाईल.
ग्राहकांना दूरचित्रवाणी (TV) संचावर हव्या त्या वाहिन्या (TV Channel) निवडता याव्यात यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) म्हणजेच ट्राय (TRAI) एक खास अॅप घेऊन आले आहे. TV Channel Selector App असे या अॅपचे नाव आहे. ज्याद्वारे ग्राहक आपल्या पसंतीच्या वाहिन्या निवडू शकतात. तसेच, आपल्याला आवडत नसलेल्या वाहिन्या हटविण्याची सोयही या अॅपमध्ये उपलब्ध आहे. ट्रायने हे अॅप ग्राहकांच्या सेवेत गुरुवार (25 जून 2020) पासून सुरु केले आहे.
अॅपबद्दल माहिती देताना ट्रायने म्हटले आहे की, प्रसारण सेवांसाठी नवे दर निश्चित केल्यानंतर ध्यानात आले की ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्या निवडण्यास अडचण येत आहे. त्यांना वाहिनी सेवा उपलब्ध करुन देणारे सेवादारांच्या संकेतस्थळांवरही ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळ हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. ट्रायने लॉन्च केलेले हे अॅप सर्व ऑपरेटर्स (दूरचित्रवाणी वाहीनी सेवा उपलब्ध करुन देणारे) यांच्याकडून माहिती घेऊनच तयार करण्यात आलेले आहे.
ट्रायने पुढे म्हटले आहे की, अनेक मोठ्या डीटीएच सेवा दाते, मल्टी सिस्टम ऑपरेटर (एमएसओ/केबल ऑपरेटर) ची माहिती उपलब्ध आहे. प्रयत्न केला जात आहे की, इतर सेवादात्यांनाही या माहितीसोबत जोडले जाईल. प्राधिकरणाने म्हटले आहे की, 'टीव्ही चॅनल सेलेक्टर अॅप' दूरचित्रवाणीवर वाहिन्या पाहणाऱ्या ग्राहकांसाठी पारदर्शक आणि विश्वासू व्यवस्था देण्याच्या हेतून सुरु करण्यात आले आहे. (हेही वाचा, खुशखबर! टीव्ही पाहणे होणार स्वस्त; TRAI च्या नव्या नियमांनुसार केवळ 130 रुपयांत पाहता येणार 200 चॅनेल्स)
अॅपवरील सर्व ग्राहकांची ओळख ही एकवेळ वापरण्यात येणारा सांकेतांक वापरुन केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाला आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सांकेतांक क्रमांक पाठविण्यात येईल. जर एखाद्या ग्राहकाने सेवापुरवठादाराकडे आपला नोंदणीकृत क्रमांक नोंद केला नसल्यास हा सांकेतांक (ओटीपी) दुरचित्रवाणी संचाच्या पटलावर दिसेन. हे अॅप गूगल प्ले स्टोर आणि अॅपल स्टोर आदी मंचावर उपलब्ध आहे.