SBI कडून मोठ्या Fixed Deposit वरील व्याजदरात कपात; ज्येष्ठ नागरिकांवरही परिणाम, मुदतपूर्व पैसे काढल्यास 1% दंड
स्टेट बँक ऑफ इंडियाने तीन कोटी रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात मर्यादित कालावधीसाठी कपात केली असून, याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवरही होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) मुदत ठेव अर्थात फिक्स्ड डिपॉसिट (Fixed Deposit) मध्ये पैसे ठेवण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने तीन कोटी रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या बल्क मुदत ठेवींवरील व्याजदरात मर्यादित कालावधीसाठी कपात केली आहे. बँकेचे नवे व्याजदर 15 ऑगस्ट 2026 पासून लागू झाले आहेत. मात्र काही कालावधींसाठीच्या मुदत ठेवींवरील दर यात बदलण्यात आलेले नाहीत, तर मोठ्या आणि दीर्घ कालावधीच्या काही ठेवींवरील दर पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत.
SBI ने 25 बेसिस पॉइंट्सने केली कपात
SBI ने तीन कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या मुदत ठेवींवर सात दिवस ते 179 दिवस या कालावधीसाठी व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. याचा अर्थ या कालावधीत नवीन मुदत ठेव करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी व्याजदर मिळणार आहे. अल्प कालावधीत मोठी रक्कम ठेव करणाऱ्या ग्राहकांसाठी हा बदल महत्त्वाचा असून, मुदत ठेव करण्यापूर्वी नवे दर तपासून घेणे फायद्याचे ठरणार आहे.
180 ते 210 दिवसांच्या ठेवींवरही कपात
बँकेने 180 ते 210 दिवस कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही कपात केली असून, या कालावधीसाठी 10 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. मात्र 211 दिवस ते दहा वर्षे या कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत, म्हणजेच या मुदतीच्या ठेवींसाठी जुनेच व्याजदर लागू राहणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवरही परिणाम
एसबीआयच्या या बदलाचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवरही होणार आहे. सात ते 179 दिवस कालावधीच्या ठेवींसाठी ज्येष्ठ नागरिकांचा व्याजदर 0.25 टक्क्यांनी, तर 180 ते 210 दिवस कालावधीसाठी 0.10 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. मात्र 211 दिवस ते दहा वर्षे कालावधीच्या ठेवींवरील ज्येष्ठ नागरिकांचा व्याजदर पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.
हे नवे दर केवळ नव्याने केल्या जाणाऱ्या बल्क मुदत ठेवींनाच नव्हे, तर मुदत संपलेल्या ठेवींच्या नूतनीकरणासही लागू होणार आहेत. त्यामुळे मुदत संपत आलेली मोठ्या रकमेची ठेव पुन्हा गुंतवण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी नूतनीकरणाच्या वेळी लागू होणारा व्याजदर तपासून घेणे आवश्यक आहे. नक्की वाचा: SBI कडून Basic Savings Bank Deposit च्या खात्यामधून रोख रक्कम काढण्याच्या शुल्कात बदल जाहीर .
मुदतपूर्व पैसे काढल्यास 1% दंड
एसबीआयने बल्क ठेवींमधून मुदतपूर्व पैसे काढण्याबाबतच्या नियमांबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. सर्व कालावधींच्या बल्क मुदत ठेवींमधून मुदतीपूर्वी पैसे काढल्यास एक टक्का दंड आकारला जाणार असून, हा नियम नवीन ठेवी तसेच नूतनीकरण केलेल्या ठेवींनाही लागू असणार आहे. यासोबतच बँकेने रोख रक्कम काढण्याच्या शुल्कातही सुधारणा केली असून, हे सुधारित शुल्क 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे.
बँकांकडून वेळोवेळी बाजारातील तरलता आणि रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक व्याजदरातील बदलांनुसार मुदत ठेवींच्या दरांमध्ये फेरबदल केले जातात. मोठ्या रकमेच्या म्हणजेच बल्क मुदत ठेवींवरील दर हे सर्वसाधारण किरकोळ मुदत ठेवींपेक्षा वेगळ्या पद्धतीने ठरवले जातात आणि बँकांच्या निधी व्यवस्थापन गरजांनुसार त्यात वारंवार बदल होत असतात. त्यामुळे मोठी रक्कम गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांनी मुदत ठेव करण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ताजे दर तपासून घेणे फायदेशीर ठरते.