SBI कडून Basic Savings Bank Deposit च्या खात्यामधून रोख रक्कम काढण्याच्या शुल्कात बदल जाहीर

स्टेट बँक ऑफ इंडियाने शाखेमार्फत उघडलेल्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खात्यांवरील रोख रक्कम काढण्याच्या शुल्कात बदल जाहीर केला असून, हा नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे. महिन्याला चार रोख व्यवहार मोफत राहणार असून, त्यानंतरच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे.

SBI कडून Basic Savings Bank Deposit च्या खात्यामधून रोख रक्कम काढण्याच्या शुल्कात बदल जाहीर
SBI | Twitter

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (Basic Savings Bank Deposit) खातेधारकांसाठी रोख रक्कम काढण्याच्या शुल्कात बदल जाहीर केला आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, हा नवा नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे. शाखेमार्फत उघडलेल्या बीएसबीडी खात्यांना हा बदल लागू असणार आहे.

बीएसबीडी खात्याची  वैशिष्ट्ये काय?

किमान शिल्लक नाही: या खात्यात कोणतीही किमान शिल्लक (minimum balance) ठेवण्याची अट नाही, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे खाते सोयीचे ठरते.

मोफत एटीएम/डेबिट कार्ड: खातेधारकाला मोफत एटीएम-कम-डेबिट कार्ड दिले जाते.

मर्यादित मोफत व्यवहार: महिन्याला ठराविक संख्येने रोख रक्कम काढण्याचे व्यवहार मोफत असतात (उदाहरणार्थ, एसबीआयमध्ये सध्या चार व्यवहार मोफत आहेत).

मोफत चेक बुक सुविधा नाही: सर्वसाधारणपणे या खात्यावर चेकबुकची सुविधा दिली जात नाही, मात्र काही बँका मूलभूत चेकबुक सुविधा देतात.

एकच खाते: एका व्यक्तीच्या नावे एकाच बँकेत एकच बीएसबीडी खाते उघडता येते.

बीएसबीडी खाते कोणासाठी उपयुक्त

बीएसबीडी  खाते विशेषतः निम्न उत्पन्न गटातील नागरिक, ग्रामीण भागातील रहिवासी, विद्यार्थी किंवा ज्यांना पारंपरिक बचत खात्यासाठी लागणारी किमान शिल्लक राखणे शक्य नाही, अशा लोकांसाठी तयार करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जन धन योजनेसारख्या सरकारी योजनांतर्गत उघडली जाणारी अनेक खाती याच प्रकारात मोडतात.  म्हणजेच, कोणत्याही किमान शिल्लक किंवा अतिरिक्त शुल्काच्या भीतीशिवाय बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी हे खाते तयार करण्यात आले आहे.

काय आहे SBI चा नवा नियम

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीएसबीडी खातेधारकांना महिन्याला चार रोख रक्कम काढण्याचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहेत. मात्र महिन्यात चारपेक्षा अधिक वेळा रोख रक्कम काढल्यास प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी १५ रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाणार आहे.  हा बदल केवळ शाखा चॅनेलद्वारे उघडलेल्या बीएसबीडी खात्यांना लागू असून, याबाबत ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन बँकेने केले आहे.

डिजिटल व्यवहारांवर परिणाम नाही

बँकेने स्पष्ट केले आहे की, या नव्या शुल्क रचनेचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व डिजिटल व्यवहार पूर्वीप्रमाणेच कोणत्याही निर्बंधाशिवाय मोफत राहतील. त्यामुळे यूपीआय, नेट बँकिंग किंवा योनो अॅपद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर या बदलाचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना

बीएसबीडी खाती प्रामुख्याने आर्थिक समावेशनाच्या उद्देशाने उघडली जाणारी मूलभूत बचत खाती असून, अशा खातेधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या शुल्क बदलाचा थेट परिणाम मोठ्या प्रमाणातील ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे.

बँकेने ग्राहकांना महिन्याभरातील रोख व्यवहारांचे योग्य नियोजन करण्याचा आणि शक्य तितके व्यवहार डिजिटल माध्यमातून पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून अतिरिक्त शुल्क टाळता येईल.

(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2026 02:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).