Gas Cylinder Weight Complaint: घरी येणार्या गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये छेडछाड झाल्यास तक्रार कुठे कराल?
जर गॅस सिलेंडरचे वजन त्यावर लिहलेल्या वजनापेक्षा 150 ग्रॅम कमी जास्त असेल तर तो सीलबंद असला तरीही तो घेऊ नका.
आजकाल भाज्यांपासून, घरातील तेल, धान्यं अशा कोणत्याही वस्तूंमध्ये भेसळ होत असल्याचे अनुभव प्रत्येकाने लहान-मोठ्या स्वरूपात घेतलेच असतील. ग्राहक म्हणून तुमची होणारी ही अशी फसवणूक अयोग्य आहे. आजही अनेक ठिकाणी स्वयंपाक घरात पाईपलाईन गॅस ऐवजी सिलेंडर्सच्या स्वरूपात गॅस पोहचवण्याचं काम अनेकजण करतात. पण यामध्येही गॅस सिलेंडर्समध्ये फसवणूक केली जाते. वजनामध्ये छेडछाड करण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे पहा तुमच्यासोबतही असा प्रकार घडल्यास नेमकं काय करायचं? तक्रार कुठे करायची? (नक्की वाचा: Book LPG cylinders through WhatsApp: HP, Indane, Bharat Gas ग्राहक जाणून घ्या गॅस बुकिंगचा व्हॉट्सअॅप नंबर आणि प्रक्रिया).
गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये फसवणूक होत असल्यास तक्रार कुठे करायची?
- जर गॅस सिलेंडरचे वजन त्यावर लिहलेल्या वजनापेक्षा 150 ग्रॅम कमी जास्त असेल तर तो सीलबंद असला तरीही तो घेऊ नका. तुम्ही संबंधित गॅस एजंसीच्या कस्टमर केअर कडे त्याची तक्रार करू शकता.
- 1800-2333-555 या टोल फ्री नंबर वर देखील संपर्क साधून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
- सोबतच पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर/ एजंसी किंवा गॅस कंपनीवर तक्रार करण्याची सोय आहे.
गॅस सिलेंडरची डिलेव्हरी घेताना काय पहाल?
गॅस सिलेंडरची डिलेव्हरी देणार्या मुलाकडे असलेल्या वजनकाट्यावर तुम्ही सिलेंडरचे वजन करू शकता. घरगुती सिलिंडरमध्ये 14.2 किलो गॅस असतो. याशिवाय रिक्त सिलिंडरचे वजन वेगळे आहे. त्याची माहिती तुम्हांला सिलेंडरवर लिहलेली दिसेल. घरगुती रिक्त सिलिंडरचे वजन 15.3 किलो आहे. अशा परिस्थितीत सिलिंडर घेताना 14.2 किलो एलपीजी गॅस आणि 15.3 किलो रिकाम्या सिलिंडरच्या वजनाने सिलिंडर तपासा.याशिवाय सिलेंडर वर असलेले प्लॅस्टिकचे आवरण पूर्ण सीलबंद आहे की नाही हे तपासा. जर ते अर्धवट असेल तर त्या सिलेंडर सोबत छेडछाड झालेली असू शकते.
भारतात सध्या कोणत्याही कोपर्यात सिलेंडर गॅसचं कनेक्शन घेणं शक्य आहे. यासाठी विविध गॅस एजंसी, कंपन्या काम करत आहेत. तुम्हांला आवडीनुसार कंपनी निवडून गॅस सिलेंडरसाठी अर्ज करताना काही माहिती, कागदपत्र द्यावी लागतात.