कोरोना महामारीमध्ये LIC कडून मोठा दिलासा; रुग्णालयात मृत्यू झाल्यास क्लेम सेटलमेंटसाठी आता 'हे' पुरावेही वापरू शकता

एक निवेदन जारी करत कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे

LIC | (File Photo)

कोविड-19 (Coronavirus) महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) एक मोठी दिलासादायक बाब जाहीर केली आहे. एलआयसीने आपल्या ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन क्लेम सेटलमेंटशी संबंधित अटींमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये थोडी सवलत दिली आहे. रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृत्यूच्या क्लेमबाबत त्वरित तोडगा काढण्यासाठी, एलआयसीने महानगरपालिकेकडून प्राप्त मृत्यू प्रमाणपत्राच्या बदल्यात मृत्यूच्या इतर पर्यायी पुराव्यांना मान्यता दिली आहे. एक निवेदन जारी करत कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे ग्राहकांना नक्कीच फायदा होणार आहे.

एलआयसीने निवेदनात म्हटले आहे की, मृत्यूच्या इतर नव्या पुराव्यांमध्ये आता शासन / ईएसआय (कर्मचारी राज्य विमा) / सशस्त्र सेना / कॉर्पोरेट रुग्णालये यांच्याद्वारे जारी केलेले मृत्यू प्रमाणपत्र, डिस्चार्ज समरी / मृत्यू समरी समाविष्ट आहे. यामध्ये मृत्यूची तारीख आणि वेळ स्पष्टपणे नमूद केले असावे. तसेच यावर  एलआयसीच्या प्रथम श्रेणी अधिकाऱ्याची (Class one Officer of LIC) किंवा दहा वर्षे सेवा देणाऱ्या विकास अधिका-यांची प्रति-स्वाक्षरी असावी. निवेदनात असेही म्हटले आहे की, अंत्यसंस्कार प्रमाणपत्र किंवा दफन प्रमाणपत्र किंवा संबंधित प्राधिकरणाद्वारे दिलेली क्रेडेन्शियल आयडेंटिटी पावतीसह सादर करावे लागेल.

इतर प्रकरणांमध्ये पूर्वीप्रमाणेच महानगरपालिकेकडून देण्यात आलेले मृत्यू प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल. सध्या सर्व्हिसिंग शाखेत क्लेम सेटलमेंटसाठी कागदपत्रे सादर करण्यात ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, एलआयसीने ड्यू मॅच्युरिटी / सर्व्हायव्हल बेनिफिट क्लेम्ससाठी जवळच्या कोणत्याही एलआयसी कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यास परवानगी दिली आहे. (हेही वाचा: SBI कडून ग्राहकांना दिलासा, आता 'या' एका कॉलवर होणार सर्व कामे)

क्लेमचा लवकर तोडगा काढण्यासाठी, एलआयसीने कस्टमर पोर्टलद्वारे ऑनलाइन नेफ्ट रेकॉर्ड तयार करणे आणि सबमिशनही सक्षम केले आहे. एलआयसीने असेही म्हटले आहे की, भांडवलाच्या परताव्याच्या पर्यायांसह एन्युइटींच्या बाबतीत, 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत ड्यू एन्युइटीजसाठी लाइफ सर्टिफिकेटच्या प्रॉडक्शनपासून सूट देण्यात आली आहे. इतर प्रकरणांमध्ये, ईमेलद्वारे पाठविलेले जीवन प्रमाणपत्र देखील स्वीकारले जात आहेत.