टोल नाक्याजवळील रहिवाशांसाठी मोठा दिलासा; FASTag स्थानिक पास आता थेट मोबाईलवर!

स्थानिक पासच्या डिजिटायझेशनच्या माध्यमातून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात राष्ट्रीय महामार्गाची एक सुरळीत आणि तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था उभारण्यासाठी नागरिक केंद्रित सेवा प्रदान करण्याचेय्या आपल्या उद्दिष्टाला पुढची दिशा दिली आहे.

टोल नाक्याजवळील रहिवाशांसाठी मोठा दिलासा; FASTag स्थानिक पास आता थेट मोबाईलवर!

FASTag on Rajmargyatra Mobile App: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ऑनलाईन फास्टॅग (FASTag) अंतर्गत स्थानिक पासच्या सुविधेची व्याप्ती वाढवली असून, आता ही सुविधा देशभरातील 121 टोल नाक्यांवर उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पाला अनुसरून तसेच, नागरिकांच्या जीवन सुलभतेत वृद्धी घडवून आणण्याची वचनबद्धता करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणाने हे पाऊल उचलले आहे. या ऑनलाईन स्थानिक पास सुविधेमुळे पात्र प्रवाशांना ‘राजमार्गयात्रा’(Rajmargyatra) या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन मासिक स्थानिक पासचे सदस्यत्व घेता येईल. यामुळे टोल नाक्यांवर प्रत्यक्ष जाण्याची आणि आवश्यक दस्तऐवज प्रत्यक्ष सादर करण्याची गरज संपुष्टात आली आहे. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि नागरिक केंद्रित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

पहिली डिजिटल स्थानिक पास सुविधा जुलै 2026 मध्ये दिल्लीतील अर्बन एक्स्टेंशन रोड-II या मार्गावरील मुंदका बक्करवाला टोल नाका इथे सुरू करण्यात आली होती. या यशस्वी अंमलबजावणीनंतर, आता या सुविधेची व्याप्ती देशभरातील 120 पेक्षा जास्त टोल नाक्यांपर्यंत विस्तारण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत देशभरातील अधिकाधिक टोल नाक्यांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कोण अर्ज करू शकते :

डिजिटल स्थानिक पास विषयक आराखड्याअंतर्गत, पात्र टोल नाक्याच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहणारे रहिवासी ‘राजमार्गयात्रा’ या मोबाईल ॲपद्वारे स्थानिक पाससाठी अर्ज करू शकतात. या पासच्या उपयोगाने पात्र प्रवाशांना, या सुविधेअंतर्गच्या तरतुदींनुसार त्या महिन्याभरात संबंधित टोल नाक्यांवरून अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते. याआधी, स्थानिक पास मिळवू इच्छिणाऱ्या प्रवाशांना संबंधित टोल नाक्यांवर प्रत्यक्ष जावे लागत होते, यासोबतच संबंधित टोल नाक्याच्या 20 किलोमीटरच्या परिघातील आपला रहिवासी पत्ता आणि पात्रतेसंबंधीच्या इतर अटींची पूर्तता करणारे दस्तऐवज सादर करणे बंधनकारक होते. राष्ट्रीय महामार्गाचा वापर करणारे नागरिक https://rajmargyatra.nhai.gov.in/buy-fastag-local-pass या संकेतस्थळाला भेट देऊन पात्र टोल नाक्यांची यादी पाहू शकतात.

डिजिटल स्थानिक पासमागील तंत्रज्ञान:

डिजिटल स्थानिक पास सुविधेअंतर्गत प्रवाशांचा रहिवासी पत्ता, वाहनाचे तपशील आणि त्याच्याशी संलग्न फास्टॅग यांसारख्या संबंधित माहितीची पडताळणी केली जाते. यासाठी डिजीलॉकर आणि वाहन या शासकीय डिजिटल व्यासपीठांच्या सहमतीवर आधारित एकात्मिकीकरणातून संबंधित प्रवाशाची माहिती मिळवली जाते. अर्जातील नोंदणीकृत पत्ता पात्र टोल नाक्याच्या निर्धारित 20 किलोमीटरच्या परिघात येतो की नाही हे तपासण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित पडताळणी करून पात्रता ठरवली जाते.

पडताळणी केलेल्या डिजिटल माहितीसाठ्याचे आणि भौगोलिक माहिती प्रणाली आधारित प्रमाणीकरणाचे एकात्मिकीकरण केल्याने, प्रत्यक्ष दस्तऐवज सादर करणे तसेच, प्रत्यक्ष पडताळणीची गरज भासत नाही. यासोबतच पात्रता निश्चित करताना अधिक सुसंगतता, पारदर्शकता आणि अचूकता राहील याचीही सुनिश्चित होते. या व्यवस्थेमुळे कमीतकमी मानवी हस्तक्षेपाची गरज भासेल, तसेच पात्र प्रवाशांना स्थानिक टोल सेवांचे वितरण अधिक सुलभतेने आणि जलदगतीने करणे शक्य होणार आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2026 07:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).