EPFO: खुशखबर! EPS अंतर्गत उच्च पेन्शन प्राप्त करण्याची संधी; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या पात्रता व अंतिम मुदत
लॉग इन करून अर्जावर डिजिटल पद्धतीने प्रक्रिया केली जाईल आणि अर्जदाराला एक पावती क्रमांक प्रदान केला जाईल.
तुम्हाला पेन्शनच्या रूपात मोठी रक्कम मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कर्मचारी सदस्य आणि त्यांचे नियोक्ते कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत उच्च पेन्शनसाठी (Higher Pension) अर्ज करू शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या अंतर्गत कर्मचारी 3 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी उच्च निवृत्ती वेतनाच्या पर्यायाची निवड करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील 4 नोव्हेंबर 2022 च्या निकालानंतर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही प्रक्रिया लवकरच ऑनलाइन सुरू करण्यात येणार असल्याचे ईपीएफओने सांगितले. यासाठी एक युनिक रिसोर्स लोकेशन (URL) जारी केला जाईल. याबाबत माहिती देण्यासाठी प्रादेशिक पीएफ आयुक्त सूचना फलक व बॅनरद्वारे माहिती देणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, परिच्छेद 11 (3) आणि 11 (4) अंतर्गत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात केवळ विशिष्ट श्रेणीतील कर्मचारीच उच्च पेन्शन योजनेसाठी पात्र असतील. हा पर्याय केवळ अशाच कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल जे 31 ऑगस्ट 2014 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य होते आणि ज्यांनी ईपीएस अंतर्गत उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडलेला नव्हता.
सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर 2022 मध्ये कर्मचारी पेन्शन (सुधारणा) योजना, 2014 वर शिक्कामोर्तब केले होते. यामध्ये निवृत्ती वेतनाची मर्यादा 6500 रुपये प्रति महिना वरून 15 हजार रुपये प्रति महिना करण्यात आली. यासाठी सदस्य आणि नियोक्त्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 8.33% योगदान देण्याची परवानगी होती.
ज्या कर्मचाऱ्यांचे अर्ज यापूर्वी फेटाळण्यात आले होते. ते लोक पोर्टल लिंकद्वारे अर्ज करू शकतात आणि जे 1 सप्टेंबर 2014 पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत ते देखील पेन्शनसाठी अर्ज करू शकतात. जे कर्मचारी 31 ऑगस्ट 2014 रोजी ईपीएसचे सदस्य होते आणि ज्यांनी ईपीएस अंतर्गत उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडलेला नाही ते कर्मचारी 3 मार्चपूर्वी अर्ज करू शकतात.
यासाठी असे कर्मचारी देखील अर्ज करू शकतात, ज्यांनी ईपीएस 95 चे सदस्य असताना उच्च निवृत्ती वेतनाची निवड केली होती, परंतु त्यांचा अर्ज ईपीएफओने नाकारला होता. (हेही वाचा: India-Singapore Linkage UPI: भारत आणि सिंगापूर डिजिटल पेमेंट सिस्टमला जोडण्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले)
दरम्यान, ईपीएफओने सांगितले की, प्रत्येक अर्जाची नोंदणी केली जाईल. लॉग इन करून अर्जावर डिजिटल पद्धतीने प्रक्रिया केली जाईल आणि अर्जदाराला एक पावती क्रमांक प्रदान केला जाईल. संबंधित प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्रभारी उच्च वेतनासह एकत्रित पर्यायाच्या प्रत्येक प्रकरणाची तपासणी करतील आणि अर्जदाराला ई-मेल/पोस्टद्वारे आणि त्यानंतर एसएमएसद्वारे निर्णय कळवतील.