Nisarga Cyclone: 'निसर्ग चक्रीवादळ' दरम्यान मुसळधार पाऊस अपेक्षित; BMC ने जारी केली DOs आणि DONTs ची यादी
प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना अंमलात आणल्या आहेत, लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे
सध्या महाराष्ट्र (Maharashtra) व गुजरातला निसर्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मुंबई (Northern Mumbai) आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीकडे जाणाऱ्या या निसर्ग चक्रवादळामुळे, 3 जून रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात आणि दमणमधील हरिहरेश्वर दरम्यान पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी दुपारच्या वेळेत मुंबई मध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशावेळी नागरिकांंनी बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. अगदी अत्यावश्यक कारण असल्यास बाहेर जाण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत मुंंबई महापालिकेच्या वतीने सुचनावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार स्वसंरक्षणासाठी काय करावे आणि काय करु नये हे जाणुन घ्या.
निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्याकरिता मुंबईकरांसाठी 'करा' व 'करू नका' याची यादी देत आहोत. बीएमसीने सांगितल्याप्रमाणे चक्रीवादळासंबंधित कुठलेही प्रश्न असल्यास कृपया 1916 डायल करा व 4 दाबा.
बीएमसी ट्वीट -
बीएमसी ने केल्या सूचनांनुसार खालील गोष्टी करा-
- मुसळधार पावसाची शक्यता असताना घरी थांबणे अतिशय उत्तम!
- अपरिहार्य कारणास्तव वाहनाने प्रवास करावा लागणार असेल तर हातोडा किंवा तत्सम वस्तू सोबत बाळगा. जेणेकरून वाहनाचे दरवाजे उघडू शकत नसतील तर काच फोडून बाहेर पडण्यास मदत होईल.
- घराबाहेर असलेल्या सैल वस्तू बांधून टाका किंवा त्यांना घरात हलवा.
- महत्वाचे दस्तऐवज व दागदागिणे प्लास्टिकच्या पिशवीत सील करुन ठेवा
- बॅटरीवर चालणारे तसेच राखीव पॉवरच्या यंत्रांचे नियमित परिक्षण करा
- दूरदर्शन व आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष ठेवा
- आपत्कालीन परिस्थीतीत करावयाच्या कृतींचा अधुनमधून सराव करा
- आपले घर कच्च नसेल किंवा झोपडी नसेल तर आपल्या घरातील एक भाग हा आपत्कालीन निवारा म्हणून ठरवा व घरातील सर्व सदस्यांनी वादळ/चक्रीवादळाच्या वेळी त्या जागेचा उपयोग कसा केला जाईल याचा सराव करा.
- आपत्कालीन उपयोगी वस्तुंची बँग (Emergency Kit) तयार ठेवा.
- खिडक्यांपासून दूर रहा, काही खिडक्या बंद करा व काही खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरुन दाब समान राहील.
- खोलीच्या मध्यभागी जा, कोपऱ्यापासून दूर रहा.
- जड टेबल किंवा डेस्क यासारख्या मजबूत फर्निचरच्याखाली जा आणि ते धरून ठेवा.
- डोके व मानेच्या संरक्षणासाठी हातांचा उपयोग करा.
- मोठे छप्पर असलेल्या जागा टाळा.
- जर एखादी उचडी जागा आणि पुरेसा वेळ असेल तर योग्य निवारा शोधा किंवा सर्वात जवळच्या छोटया खड़्यात किंवा चरात पडून रहा.
- आधी ठरवून ठेवलेल्या किंचा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी स्थलातरीत व्हा.
- आपत्कालात न लागणाच्या सर्व उपकरणांचा व साधनांचा विद्युतपुरवठा खेंडीत करा
- पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.
- वायुगळती तपासा. जर तुम्हाला गॅसचा वास आला किंवा गळतिचा आवाज आला तर तातडीने खिडक्या उघडा व इमारतीमधून बाहेर पड़ा.
- शक्य असेल तर गॅसची झडप बंद करा व गॅस कंपनीला कळवा.
- विद्युत उपकरणे तपासा, जर तुम्हाला ठिणग्या, उचड्या तारा दिसल्या किंवा रबरचा जळका वास आला तर मुख्य विद्युत पुरवठा खंडीत करा व इलेक्ट्रीशियनला सल्ल्यासाठी बोलवा.
- ज्यांना विशेष मदतीची गरज आहे अशांना, लहान मुलांना, शारीरिक दृष्टया अपंग व्यक्तींना, वयोवृध्द माणसांना, शेजाऱ्यांना मदत करा.
या गोष्टी करू नका –
- अफवा पसरवू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका
- वादळ/चक्रीवादळाच्या दरम्यान गाडी किंवा ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न करु नका
- नुकसान झालेल्या इमारतींपासून दूर रहा.
- अधिक इजेचा प्रत्यक्ष धोका असल्याशिवाय गंभीर जखमींना हलवू नका,. त्यामुळे त्यांना अधिक इजा होऊ शकते.
- सांडलेली औषधे, तेल व इतर ज्वालाग्राही पदार्थ पसरु देऊ नका. त्यांना ताबडतोब स्वच्छ करा.
दरम्यान. नुकतेच ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे अम्फान वादळ आले होते, त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे लोक घाबरले आहेत. मात्र वर बीएमसीने सांगितलेल्या या गोष्टी तुम्ही लक्षात ठेऊन त्या वेळप्रसंगी अंमलात आणल्या तर तुम्ही खचितच स्वतःचे रक्षण करू शकाल.