Dexamethasone: करोना व्हायरस रुग्णांसाठी 'डेक्सामेथासोन' औषध वापरायला आरोग्य मंत्रालयाने दिली परवानगी
आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात ग्लूकोकोर्टिकोस्टेरॉइड डेक्सामेथासोनचा वापर मेथिलप्रेडनिसोलोनच्या पर्याय म्हणून करण्याची परवानगी दिल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) कोविड-19 (COVID-19) साठी क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल सुधारित केले आहे. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात ग्लूकोकोर्टिकोस्टेरॉइड डेक्सामेथासोनचा (Dexamethasone) वापर मेथिलप्रेडनिसोलोनच्या (Methylprednisolone) पर्याय म्हणून करण्याची परवानगी दिल्याचे म्हटले आहे. करोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे. डेक्सामेथासोन एक स्टिरॉइड आहे जे ऑक्सिजन समर्थनासह कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे लक्षणीय प्रमाण कमी करतो. करोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे, असा जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिला होता. (Coronavirus Vaccine: 'कोरोनावरील लस मिळण्यास एक वर्ष लागणार', WHO प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेससचा दावा)
सर्वप्रथम इंग्लंडमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध करोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. डेक्सामेथासोन, औषध प्रामुख्याने संधीवात, अॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध करोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. शिवाय, डेक्सामेथासोनचा डोस कमी प्रमाणात देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात असा संशोधकांनी अभ्यासातून निष्कर्ष मांडला आहे. या औषधामुळे मृत्यू दर कमी होत आहे. करोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे समोर आले आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने देखील एका संशोधनात याची पुष्टी केली आहे की डेक्सॅमेथासोन गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना रूग्णांमध्ये मृत्यूची शक्यता 35 टक्क्यांपर्यंत कमी करते. हे औषध बाजारात सहज उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात आहे, परंतु यादरम्यान दिलासा देणारी बातमी म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाखांवर पोहोचली आहे. देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 58 टक्क्यांहून अधिक झाला आहे, जी एक चांगली बातमी आहे.