Banking Service: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता 1 नोव्हेंबर 2020 पासून पैसे जमा करणे व काढण्यासाठी भरावे लागेल शुल्क- Reports
यातील काही सेवांसाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जातात, मात्र त्याची फारच कमी लोकांना माहिती असते. एसएमएस सुविधेचा उपयोग, कमीत कमी शिल्लक, एटीएम व अगदी चेकचा वापर यांसाठीही बँक तुमच्याकडून पैसे घेते.
सध्या बर्याच बँकिंग सुविधा (Banking Services) आहेत ज्यांचा वापर जवळजवळ प्रत्येक ग्राहक नेहमीच करतात. यातील काही सेवांसाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जातात, मात्र त्याची फारच कमी लोकांना माहिती असते. एसएमएस सुविधेचा उपयोग, कमीत कमी शिल्लक, एटीएम व अगदी चेकचा वापर यांसाठीही बँक तुमच्याकडून पैसे घेते. परंतु यामध्ये आता अजून एका गोष्टीची भर पडली आहे. ग्राहकांना आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी (Depositing & Withdrawing) शुल्क भरावे लागणार आहे. बँकेत पैसे जमा करण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंतची विनामूल्य बँकिंग सेवा संपुष्टात येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून बँकेत या दोन्ही सेवांवर शुल्क आकारले जाईल.
याची सुरुवात बँक ऑफ बडोदापासून झाली आहे. बँक ऑफ इंडिया, पीएनबी, अॅक्सिस आणि सेंट्रल बँकही लवकरच या प्रकरणात निर्णय घेऊ शकतात. मात्र, हा शुल्क निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक बँकिंगनंतरच भरावा लागेल. चालू खाते, कॅश क्रेडिट लिमिट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यात पैसे जमा आणि काढण्यासाठी बँक ऑफ बडोदाने शुल्क निश्चित केले आहे. पुढच्या महिन्यापासून ग्राहकांना एका महिन्यात तीन वेळा अशा क्रिया घडल्यानंतर 150 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.
ग्राहक बचत खात्यातून तीन वेळा मोफत पैसे जमा करू शकतात, पण चौथ्यांदा खात्यात पैसे जमा झाले तर शुल्क म्हणून तुम्हाला 40 रुपये द्यावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांनाही बँकांनी कोणतीही दिलासा दिला नाही. मात्र, जन धन खातेधारकांना पैसे जमा करण्यासाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही, परंतु पैसे काढण्यासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांनी दिवसाला एक लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केल्यास ही सुविधा विनामूल्य असेल. परंतु जर आपण यापेक्षा अधिक रक्कम जमा केली तर बँका तुमच्याकडून पैसे घेतील. (हेही वाचा: खुशखबर! आता कन्फर्म रेल्वे तिकिटांवर तुम्ही बदलू शकता प्रवाशाचे नाव, IRCTC ने दिलेल्या या सुविधेचा कसा कराल वापर)
सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खात्यांमधून महिन्यातून तीन वेळा पैसे काढल्यास ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.