Indian Weddings: भारतात अन्नानंतर विवाह उद्योग बनला दुसरा सर्वात मोठा व्यवसाय; शिक्षणापेक्षा लग्नावर होत आहे दुप्पट खर्च- Jefferies Report

एक भारतीय जोडपे लग्नावर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च करत आहे. दुसरीकडे, अमेरिकेत लग्नांवर होणारा खर्च हा शिक्षणावरील खर्चाच्या निम्मा आहे.

Wedding | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतातील विवाह (Indian Weddings) हा लोकांसाठी त्यांचा अभिमान, आनंद आणि श्रीमंती दर्शविण्याचा एक मार्ग आहे. यामुळेच भारतात लग्नाचा बाजार मोठा होत आहे. देशातील प्रत्येक कुटुंब एका लग्नावर सरासरी 12 लाख रुपये खर्च करत आहे. भारतीय वेडिंग इंडस्ट्री आता 130 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ बनली आहे. अन्न आणि किराणा नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा उद्योग बनला आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ होईल, अशी आशा आहे.

इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म जेफरीजच्या (Jefferies) अहवालानुसार, भारतीय लग्न उद्योग अमेरिकेच्या दुप्पट आहे. मात्र तो चीनपेक्षा लहान आहे. जेफरीजचा अंदाज आहे की, भारतात दरडोई उत्पन्नाच्या 5 पट लग्नावर खर्च होत आहे. एक भारतीय जोडपे लग्नावर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च करत आहे. दुसरीकडे, अमेरिकेत लग्नांवर होणारा खर्च हा शिक्षणावरील खर्चाच्या निम्मा आहे. अमेरिकेची लग्नाची बाजारपेठ $70 अब्ज आणि चीनची $170 अब्ज आहे. अहवालानुसार, भारतीय विवाहसोहळे अनेक दिवस चालतात आणि ते अगदी साधे ते अत्यंत भव्य असे असतात. यामध्ये प्रदेश, धर्म आणि आर्थिक पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावते.

भारतातील कुटुंबांचे सरासरी उत्पन्न वार्षि 4 लाख रुपये आहे. असे असूनही लोक आपल्या सरासरी उत्पन्नाच्या तिप्पट खर्च लग्नसोहळ्यांवर करत आहेत. अहवालानुसार, भारतात दरवर्षी 80 लाख ते 1 कोटी विवाह होतात. हा आकडा संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. विवाहसोहळ्यांमुळे दागिने, कपडे, इव्हेंट मॅनेजमेंट, केटरिंग आणि मनोरंजन यांसारखे व्यवसायही भरभराटीला येत आहेत. भारतात होणाऱ्या लग्झरी विवाहांवर होणारा खर्च सरासरीपेक्षा कितीतरी जास्त आहे. (हेही वाचा: Rule Change From 1st July 2024: 1 जुलैपासून होणार आहेत 'हे' 5 मोठे बदल; किचनपासून बँक खात्यापर्यंत दिसेल या बदलाचा परिणाम)

अहवालात म्हटले आहे की, भारतात आजकाल लग्नाआधीच्या भव्य कार्यक्रम आणि समुद्रपर्यटन इत्यादींवर पैसे खर्च केले जात आहेत. ज्वेलरी उद्योगाचा निम्म्याहून अधिक महसूल वधूच्या दागिन्यांच्या विक्रीतून येतो. भारतीय वेडिंग मार्केटची कमाई आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार याचा अंदाज यावरून लावता येतो की, गेल्या वर्षी पीएम मोदींनी 'वेड इन इंडिया'ची हाक दिली होती. यामध्ये पंतप्रधानांनी लोकांना देशामध्ये डेस्टिनेशन वेडिंग साजरे करण्यास सांगितले होते.