अमानुष कृत्य! उत्तर प्रदेशमध्ये तरुणाला बेदम मारहाण, चेहऱ्यावर लघवी करून बनवला व्हिडिओ; पोलिसांनी तपास न करता पीडित व्यक्तीलाचं पाठवलं तुरुंगात

त्यानंतर पीडिताची जामिनावर सुटका झाल्यानंतर आणि घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला.

Crime | (File image)

उत्तर प्रदेशामधील (Uttar Pradesh) गोंडा शहरातील एलबीएस चौकाजवळ रस्त्याच्या मधोमध तरुणाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर या तरुणाला काठीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत ​​चेहऱ्यावर लघवी करून व्हिडिओ बनवला. यानंतर त्याला पिस्तुल आणि काडतुसांसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी कोणताही तपास न करता आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून पीडिताला तुरुंगात पाठवले. त्यानंतर पीडिताची जामिनावर सुटका झाल्यानंतर आणि घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला.

प्राप्त माहितीनुसार, 31 ऑक्टोबर रोजी वजीरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एक तरुण नगर कोतवाली भागातील गायत्रीपुरम येथे राहणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी गेला होता. संध्याकाळी परतत असताना वजीरगंजच्या सेहरिया गावातील रहिवासी कप्तान सिंगने त्याच्या सात मित्रांसह त्याला एलबीएस चौरस्त्यावर थांबवले आणि रस्त्यावर बेदम मारहाण केली. (हेही वाचा - Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी; दोन महिन्यांत भारतात येऊ शकतं 'हे' मोठं संकट)

यानंतर तरुणाला ओढत जवळच्या बागेत नेऊन काठीने मारहाण केली. त्यानंतर छातीवर पिस्तुल ठेवून जीवे मारण्याची धमकी देत, चेहऱ्यावर लघवी करून व्हिडिओही बनवला. यावेळी तो तरुण विनवणी करत राहिला मात्र कोणीही त्याचे ऐकले नाही. त्यानंतर आरोपींनी पिस्तुल आणि काडतुसांसह तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ला करण्यासाठी आल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तरुणाची कारागृहात रवानगी केली.

कारागृहातून जामिनावर सुटलेल्या तरुणाने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून न्यायाची याचना केली. त्याचवेळी त्याच्यासोबत केलेल्या अमानुषतेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. एएसपी शिवराज प्रजापती यांनी सांगितले की, या घटनेबाबत व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे आठ तरुणांवर खुनी हल्ला आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल.