Hyderabad Encounter: हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणातील चारही आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवा; तेलंगणा उच्च न्यायालयाचा आदेश
त्यामुळे आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत.
Hyderabad Encounter: हैदराबादमध्ये मागच्या आठवड्यात 27 वर्षीय महिला वेटरनरी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर केला. दरम्यान, तपासासाठी चारही आरोपींना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या चकमकीत पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले होते. या घटनेनंतर देशभरातून स्वागत करण्यात आलं. परंतु, काहींनी या घटनेला विरोध दर्शवला. आता या प्रकरणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे तेलंगणा उच्च न्यायालयाने या चारही आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत. (हेही वाचा - Hyderabad Encounter: स्वसंरक्षणातून एनकाऊंटर; सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांची माहिती)
या एन्काऊंटर विरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यात न्यायिक हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने सरकारला या आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी या चारही आरोपींचा एन्काऊंटर केला होता. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार केले, अशी माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली होती.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने घटनास्थळी जाऊन एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करावा, असा आदेश विशेष तपास पथकाला देण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एक पथक तयार केले आहेत. या पथकाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस अधीक्षक करणार आहेत.