Henley Passport Index 2020: जगात जपानचा पासपोर्ट ठरला सर्वात पॉवरफुल, सिंगापूरचा 2 रा नंबर; जाणून घ्या भारताचे स्थान

यानंतर सिंगापूरला दुसर्‍या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. या यादीत भारतीय पासपोर्टचा क्रमांक. 84 वा आहे. भारतीय पासपोर्टद्वारे, आपण व्हिसाशिवाय जगातील केवळ 58 देशांमध्ये प्रवास करू शकता.

भारतीय पासपोर्ट. Representative Image. (Photo Credits: File Image)

तुम्हाला जगात कुठेही फिरायचे असल्यास, त्यासाठी पासपोर्ट (Passport) असणे सर्वात महत्त्वाचे आहे. काही देशांचे पासपोर्ट इतके शक्तिशाली असतात की, तुम्ही बर्‍याच देशांमध्ये सहज प्रवास करू शकता. हेनली पासपोर्ट निर्देशांकात (Henley Passport Index 2020) यंदाची सर्वात पॉवरफुल पासपोर्टची (World's Most Powerful Passport) यादी जाहीर केली गेली आहे.

यामध्ये कोणत्या देशाचा सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे याबद्दल माहिती दिली आहे. या यादीनुसार जपानचा (Japan) पासपोर्ट सर्वात शक्तिशाली मानला गेला आहे. यानंतर सिंगापूरला दुसर्‍या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. या यादीत भारतीय पासपोर्टचा क्रमांक. 84 वा आहे. भारतीय पासपोर्टद्वारे, आपण व्हिसाशिवाय जगातील केवळ 58 देशांमध्ये प्रवास करू शकता.

2020 मध्ये भारताची पासपोर्ट रँकिंग दोन स्थानांनी घसरून 84 वर आली आहे. मॉरीशियाना आणि ताजिकिस्तान हे भारतासह 84 व्या क्रमांकावर आहेत. पाच सर्वात प्रभावी पासपोर्टमध्ये अनुक्रमे जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जर्मनी (संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर) आणि फिनलँडचे पासपोर्ट समाविष्ट आहेत. स्पेन, लक्समबर्ग आणि डेन्मार्कचे पासपोर्ट प्रभावी पासपोर्टच्या बाबतीत संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत. चिनी पासपोर्ट 71 व्या क्रमांकावर आहे.

भारतीय पासपोर्ट धारकांना भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, मकाऊ, मालदीव, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, केनिया, मॉरिशस, सिचिलास, झिम्बाब्वे, युगांडा, इराण आणि कतार या 58 देशांमध्ये व्हिसा-रहित प्रवेश मिळू शकेल. मात्र  बर्‍याच देशांमध्ये आपल्याला व्हिसा-ऑन-अरायव्हल घ्यावा लागू शकतो. (हेही वाचा: आता व्हिसाशिवाय फिरू शकता हे सुंदर देश)

इंटरनेशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या आकडेवारीनुसार, हेनली अँड पार्टनर्सने हा पासपोर्ट इंडेक्स, पासपोर्ट धारक किती देशांकडे व्हिसाशिवाय प्रवेश मिळवू शकेल या आधारे ही यादी जाहीर केली आहे. जपानी पासपोर्ट असलेल्या लोकांना 191 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येऊ शकतो. सिंगापूर पासपोर्ट असलेले लोक 190 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात. सिगापूरचा पासपोर्टही खूप शक्तिशाली मानला जातो. अफगाणिस्तानचा पासपोर्ट हा जगातील सर्वात वाईट पासपोर्ट ठरला आहे, तर पाकिस्तानचा पासपोर्ट चौथा सर्वात वाईट पासपोर्ट आहे.