Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये विधवा महिलेवर निर्भयासारखे क्रौर्य; सामूहिक बलात्कारानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड

पीडितेच्या नवऱ्याचा जवळपास चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पीडित महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह तिच्या बहिणीसोबत झोपडीत राहत होती.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशात निर्भया सामूहिक बलात्कारासारखीचं (Nirbhaya Gang Rape Case) लाजिरवाणी घटना घडली आहे. एका विधवा महिलेवर चार पुरुषांनी बलात्कार केला आणि त्यानंतर नराधमांनी पीडितेच्या खासगी भागात लोखंडी रॉड टाकला. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर अमलिया पोलिस स्टेशन भागात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या नवऱ्याचा जवळपास चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पीडित महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह तिच्या बहिणीसोबत झोपडीत राहत होती. ही महिला येथे एक छोट दुकान चालवत असे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा आरोपी पीडितेच्या घरी आले आणि त्यांनी तिला पिण्यासाठी पाणी मागितले. जेव्हा त्या महिलेने पाणी देण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी झोपडीत प्रवेश केला आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधम ऐवढ्यावरचं थांबले नाहीत तर त्यांनी घटनास्थळीवरून फरार होण्यापूर्वी पीडितेच्या खाजगी भागात लोखंडी रॉड टाकला. (वाचा - Gang Rape In Aurangabad: वाराणसीहून औरंगाबादमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार)

त्यानंतर पीडित महिलेला ऑटोरिक्षाने अमलिया पोलिस ठाण्यात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर पीडितेला बेशुद्ध अवस्थेत पुढील उपचारांसाठी तातडीने संजय गांधी मेडिकल कॉलेज, रीवा येथे नेण्यात आले. रुग्णालयाच्या स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या एचओडी डॉ. कल्पना यादव यांनी सांगितले की, “पीडित महिलेस गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक आहे. नराधमांनी जननेंद्रियांमध्ये रॉड घातल्यामुळे तिला अंतर्गत दुखापत झाली होती. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या पीडितेची प्रकृती धोक्या बाहेर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत."

रीवा रेंजचे आयजी उमेश जोगा यांनी सांगितलं की, पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे गावचेचं रहिवासी आहेत. पोलिसांनी कलम 376, 324, 542, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.