अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायलयात पुढील सुनावणी 31 जुलै दिवशी; UGC 29 जुलैला मांडणार आपली बाजू
कोरोना संकटकाळामध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत विद्यापीठांनी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात अशी नियमावली UGC ने जारी केल्यानंतर देशात अनेकांनी या विरूद्ध आवाज उठवला.
कोरोना संकटकाळामध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत विद्यापीठांनी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात अशी नियमावली UGC ने जारी केल्यानंतर देशात अनेकांनी या विरूद्ध आवाज उठवला. दरम्यान महाराष्ट्रात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह देशातील विद्यार्थी, शिक्षकांनी सर्वोच्च न्यायलयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सश्या रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान यावर आज सुनावणी झाली असून पुढील 3 दिवसांत म्हणजे 29 जुलै पर्यंत यूजीसीला यावर आपली बाजू मांडायची आहे. तर 31 जुलै दिवशी सर्वोच्च न्यायालय पुढील सुनवणी करणार आहे.
युजीसीच्या नव्या गाईडलाईननुसार, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संबंधित विद्यापीठांनी ऑनलाईन, ऑफलाईन किंवा दोन्ही पर्यायांचा एकत्र वापर करून घ्यावी. तसेच सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्यासाठी वेळ देण्यात आली होती. मात्र कोरोना संकटकाळात अशाप्रकारे विद्यार्थांना परीक्षांसाठी बोलवणं हे त्याच्या आरोग्याशी खेळण्यासारखं आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करून सरासरी गुण देण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान महाराष्ट्रामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत निकाल लावण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच जे विद्यार्थी निकालाबाबत समाधानी नसतील त्यांच्यासाठी कोरोना संकटाचा काळ सरल्यानंतर परीक्षा देण्याची सोय केली जाईल असं म्हटलं आहे. असाच नियम एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील लावण्यात आला आहे. मात्र आता युजीसी परीक्षांचा आग्रह करत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान युजीसीने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये राज्य सरकारला विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचे अधिकार नसल्याचं सांगण्यात आले आहे.