SSC Board Exam 2019: दहावी परीक्षेचा विज्ञान-१ विषयाचा पेपर फुटला; प्रश्नपत्रिका WhatsApp वर व्हायरल
भिवंडी शहर पोलीस ठाण्यात (Bhiwandi city police station) दाखल झालेल्या तक्रारीनुसार परीक्षेच्या दिवशी (15 मार्च 2019) विज्ञान-1 ची प्रश्नपत्रिका सकाळी 10 वाजून 7 मिनिटांनी WhatsApp वर व्हायरल झाली होती.
Maharashtra SSC 10th Board Exam 2019: कॉपी आणि पेपर फुटीच्या घटना टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) नेहमीच विशेष प्रयत्न करते. या प्रयत्नांमुळे अशा प्रकारांना आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते. परंतू, या प्रयत्नांमुळे अशा घटना शंभर टक्के टाळल्या जाताच असे नाही. राज्यभरात सुरु असलेल्या इयत्ता दहावी परीक्षा वेळी भिवंडी (Bhiwandi) येथील पेपरफुटीच्या घटनेमुळे हे पुन्हा एकदा पुढे येत आहे. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात (Bhiwandi City Police Station) दाखल झालेल्या तक्रारीनुसार परीक्षेच्या दिवशी (15 मार्च 2019) विज्ञान-1 ची प्रश्नपत्रिका सकाळी 10 वाजून 7 मिनिटांनी WhatsApp वर व्हायरल झाली होती.
गोविंदप्रसाद शर्मा (रा. भिवंडी) यांनी या संबंधी भिवंडी पोलिसांत 16 मार्च रोजी तक्रार दिली आहे. शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीत परीक्षेदरम्यान ज्या दिवशी विक्षान-1 या विषयाचा पेपर होता त्याच दिवशी पेपर फुटला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने परिक्षेसाठी नेमून दिलेल्या नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच परीक्षा सुरु होण्यापूर्वीच संबंधीत विषयाची प्रश्न पत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली होती. काही विद्यार्थ्यांना तर ही प्रश्न पत्रिका परिक्षेच्या आदल्या दिवशी किंवा परिक्षेच्या दिवशी पेपर सुरु होण्यापूर्वीच उपलब्ध होणार असल्याची माहितीही मिळाली होती, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका अनधिकृत पद्धतीने मिळवली. हाच प्रकार गणित, भूमिती या विषयाच्या प्रश्नपत्रिकांबाबतही झाल्याचा दावा आपल्या तक्रारीत गोविंदप्रसाद शर्मा यांनी केला आहे. या संदर्भात मंडळाच्या मुंबई विभागातील अधिकारी यांच्याकडे पाठपूरावा केला. तसेच, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही पत्र लिहिले. परंतू कोणीही दखल घेतली नाही, असाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. (हेही वाचा, लोकसभा निवडणूक 2019: मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलल्या 75 परीक्षा; 27 परीक्षांच्या वेळपत्रकात बदल)
दरम्यान, भिवंडी शहर पोलीस ठाणे सहाय्याक पोलीस निरिक्षक एस. बी. पाटील यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमानी दिलेल्या वृत्तात शर्मा यांनी सर्व पुराव्यानिशी तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकीशी करुन शर्मा यांच्या तक्रारीची आपल्या विभागामार्फत शहानिशा करावी अशी सूचना मंडळाच्या विभागीय सचिवांना पत्र लिहून केली आहे. विक्षान-1 विषयाचा पेपर 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सुरु होणार होता. तर, त्याच दिवशी म्हणजेच 15 मार्च 2019 ला सकाळी 10.17 मिनिटांनी या विषयाचा पेपर अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर होता, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीसंदर्भात मंडळ चौकशी करणार असल्याचे समजते.