Maharashtra HSC Board Exams 2021: 12 वीच्या विद्यार्थ्यांना 15 डिसेंबर- 4 जानेवारी दरम्यान यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी करता येणार अर्ज
विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या माध्यमातूनच सरल डाटाबेस द्वारा फॉर्म भरणं आवश्यक आहे.
महाराष्ट्रात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शाळा- कॉलेज पूर्ण क्षमतेने उघडू शकली नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वेळापत्राचा बोजवारा उडाला आहे. मात्र आगामी वर्षात बोर्डाची 12वीची परीक्षा देणार्यांसाठी शिक्षण मंडळाने मात्र प्रवेश अर्ज करण्याचे वेळापत्रक जारी केले आहे. काल शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा 2021 ची महाराष्ट्र राज्य बोर्डाची 12वीची परीक्षा देणारे विद्यार्थी 15 डिसेंबर ते 4 जानेवारी मध्ये आपले अर्ज दाखल करू शकतात. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या माध्यमातूनच सरल डाटाबेस द्वारा फॉर्म भरणं आवश्यक आहे.
व्होकेशनल कोर्स, 17 नंबरचा फॉर्म भरून खाजगी स्वरूपात परीक्षा देणारे श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणारे तसेच रिपिटर्स यांना स्वतंत्र वेळ दिली आहे. हे विद्यार्थी यंदा 5 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान फॉर्म भरू शकतील. यंदा फीचं पेमेंट आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
शाळा- कॉलेजेसमध्ये फॉर्म भरल्यानंतर फी चलान डाऊनलोड करून त्याची रक्कम संबंधित बॅंकेमध्ये 15 डिसेंबर ते 25 जानेवारी दरम्यान भरावे लागणार आहेत. Maharashtra SSC, HSC 2021 Exams: फॉर्म नंबर 17 भरून 10 वी, 12वी ची परीक्षा देणार्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2 नोव्हेंबरपासून होणार सुरू.
मागील वर्षी बारावीला 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी सामोरे गेले होते त्यांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान झाली होती. तर यंदा कोरोना संकटामुळे परीक्षा एप्रिल - मे 2021 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अनलॉक दरम्यान महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून राज्यातील ग्रामीण भागातील 9 ते 12 वी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय मेट्रो सिटीमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम देखील पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.