D D Sahyadri Dyanganga: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री चॅनेलवर 15 मार्चपासून पुन्हा विषयनिहाय तासिकांचे आयोजन; इथे पहा वेळापत्रक

सध्याच्या वेळापत्रकानुसार 12वीसाठी 23 एप्रिल आणि 10 वी साठी 29 एप्रिल पासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत.

Students | Representational Image (Photo Credits: Getty Images)

महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातही शाळा, कॉलेजेस पुन्हा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे यंदा बोर्डाची परीक्षा देणार्‍या 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आता सरकार एक पाऊल पुढे आले आहे. शिक्षण विभागाकडून आता पुन्हा 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डीडी सह्याद्री वर विषयनिहाय तासिकांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 मार्च पासून सह्याद्री चॅनेलवर विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रम पाहता येणार आहे. 10th and 12th Board Examinations 2021: इयत्ता 10 दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने नियोजीत वेळेत पार पडणार -वर्षा गायकवाड.

दरम्यान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष सोय केल्याचं सांगितलं आहे. विद्यार्थ्यांना या  तासिकांचं सविस्तर वेळापत्रकं 'इथे' पहायला मिळणार आहे. युट्युब वर देखील SCERT,Maharashtra पुणे या चॅनेलवर तुम्हांला काही व्हिडीओज पहायला मिळतील.

वर्षा गायकवाड यांचं ट्वीट

राज्यात 23 नोव्हेंबरपासून 12 वीचे वर्ग सुरू झाले होते पण पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा-कॉलेज बंद केली जात आहेत. त्यामुळे मागील वर्षी जशी विद्यार्थ्यांसाठी युट्युब चॅनेलद्वारा काही विषयांचे व्हिडिओज बनवून ते प्रदर्शित करण्यात आले होते तशीच आता पुन्हा तयारी सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वर नियमित 12.30 ते 3.30 या वेळेत कार्यक्रम दाखवला जाणार आहे. दरम्यान यंदा 12वीचे, 10वीचे पेपर्स ऑफलाईन घेण्यावर पालक आणि शिक्षण विभाग ठाम आहे. तर या परीक्षा सध्याच्या वेळापत्रकानुसार 12वीसाठी 23 एप्रिल आणि 10 वी साठी 29 एप्रिल पासून सुरू होणार आहे.